
माणदेश एक्सप्रेस न्यूज | पुणे :
पुण्यातील गणेशोत्सव मिरवणुकीदरम्यान मोठा गोंधळ उडाला. ढोल-ताशा पथकातील काही सदस्यांनी वार्तांकनासाठी गेलेल्या महिला पत्रकाराचा विनयभंग केला, तसेच तिच्या सहकारी पत्रकाराला मारहाण केली. यामध्ये संबंधित पत्रकाराचा चष्मा तुटला असून, डोळा जखमी होण्यापासून थोडक्यात बचावला. या घटनेमुळे पत्रकारांमध्ये संतापाचे वातावरण आहे. फरासखाना पोलिस ठाण्यात महिला पत्रकाराने लेखी तक्रार नोंदवली असून, या प्रकरणी पोलिस आयुक्त तसेच वरिष्ठ अधिकार्यांचे लक्ष वेधण्यात आले आहे.
शनिवारी (७ सप्टेंबर) सायंकाळी सात ते आठ वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरात वार्तांकनासाठी आलेल्या महिला पत्रकार व त्यांचे सहकारी गर्दीतून पुढे जात होते. त्यावेळी त्रिदल ढोल-ताशा पथकातील काही वादकांनी त्यांच्या मार्गात अडथळा आणला. याचवेळी महिलेच्या अंगाला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्यात आला. महिला पत्रकाराने तत्काळ विरोध केला असता, पथकातील सदस्यांनी त्यांना शिवीगाळ करून धमकावले.
याच गोंधळात सहकारी पत्रकारालाही मारहाण करण्यात आली. त्यामध्ये तो रस्त्यावर कोसळला व त्याचा चष्मा तुटला. डोळा जखमी होण्यापासून थोडक्यात बचावला.
घटना घडल्यानंतर महिला पत्रकाराने जवळच तैनात असलेल्या पोलिस कर्मचार्याला माहिती दिली. परंतु, त्याने कोणतीही तात्काळ दखल घेतली नाही. त्यानंतर संबंधित महिलेने पोलिसांच्या 112 हेल्पलाइनवर कॉल करून मदत मागितली. अखेर फरासखाना पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली.
या प्रकरणाबाबत फरासखाना पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रशांत भस्मे यांनी सांगितले की, “संबंधित महिला पत्रकाराशी संपर्क साधण्यात आला आहे. त्यांना औपचारिक तक्रार दाखल करण्यास सांगितले आहे. तक्रारीनुसार पुढील कारवाई करण्यात येईल.”
घटनेनंतर पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाने पोलिस आयुक्तांसोबतच राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले आहे. पत्रकार संघाने तातडीने या प्रकरणी कठोर कारवाई करून दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
गणेशोत्सवातील वार्तांकनासाठी काम करणाऱ्या पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिस समोर उपस्थित असूनही महिलेला संरक्षण मिळाले नाही, हा गंभीर मुद्दा असल्याने पत्रकारांमध्ये प्रचंड संताप आहे. भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी पोलिसांनी तातडीने कडक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.