
माणदेश एक्स्प्रेस न्यूज | पुणे :
व्यवसायासाठी ८१ कोटी रुपयांचे कर्ज खासगी वित्तीय संस्थेकडून मंजूर करून देण्याच्या आमिषाने एका बांधकाम व्यावसायिकाची तब्बल एक कोटी ७८ लाख ९५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकाराची नोंद शिवाजीनगर पोलिस ठाण्यात झाली असून, या प्रकरणी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे पुण्यातील सेनापती बापट रस्ता परिसरात वास्तव्यास असून बांधकाम व्यवसायात कार्यरत आहेत. त्यांची गेल्यावर्षी आरोपींशी ओळख झाली. या ओळखीचा फायदा घेत आरोपींनी “खासगी वित्तीय संस्थेकडून ८१ कोटी रुपयांचे कर्ज माफक दरात मिळवून देऊ” असे आमिष दाखवले.
यानंतर कर्जमंजुरीची प्रक्रिया, विविध कागदपत्रांची पूर्तता, तसेच आवश्यक औपचारिकता पूर्ण करण्याच्या नावाखाली आरोपींनी वेगवेगळ्या कालावधीत एक कोटी ७८ लाख ९५ हजार रुपये तक्रारदारांकडून उकळले. मात्र एवढे पैसे घेतल्यानंतरही कर्ज मंजूर झाले नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर व्यावसायिकाने पोलिस ठाण्यात धाव घेतली.
शिवाजीनगर पोलिसांनी तक्रारीची पडताळणी करून संबंधित आठ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
अलिकडच्या काळात मोठ्या कर्जाचे आमिष दाखवून व्यावसायिक, व्यापारी, तसेच सामान्य नागरिकांची फसवणूक केल्याचे अनेक प्रकार उघडकीस येत आहेत. त्यामुळे कोणीही अपरिचित व्यक्तींकडून मोठ्या रकमेचे कर्ज मिळवून देण्याची ऑफर देत असल्यास त्याची पडताळणी करणे आणि पोलिस व वित्तीय संस्थेकडून अधिकृत माहिती घेणे आवश्यक असल्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.


