
माणदेश एक्सप्रेस न्यूज | पुणे :
पुण्यातील कोथरूड पोलिस ठाण्यात महिला व दलित अत्याचाराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तीन दलित तरुणींनी थेट पोलीस अधिकाऱ्यांवर शारीरिक आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप करत तक्रार दाखल केली आहे. विशेषतः एका पीएसआयच्या वर्तनावर केलेला आरोप चक्रावून टाकणारा आहे. पीडितेच्या म्हणण्यानुसार, “पीएसआय कामठेंच्या हनुवटीचा माझ्या शरीराला घाणेरडा स्पर्श झाला”, असे वर्णन तिने तक्रारीत स्पष्टपणे नोंदवले आहे.
काय आहे प्रकरण?
या प्रकरणाची सुरुवात छत्रपती संभाजीनगरमधील एका विवाहित महिलेपासून झाली. पतीच्या सततच्या छळाला कंटाळून ती पुण्यात आली. तिचे सासरे हे माजी पोलीस अधिकारी असून, त्यांच्या प्रभावाचा वापर करत संबंधित महिला व तिच्या पुण्यातील मैत्रिणींना त्रास दिला गेला, असा आरोप आहे. ही महिला पुण्यात आपल्या दोन मैत्रिणींसोबत राहत होती. याच घरात कोथरूड पोलिसांनी अचानक छापा मारल्याची माहिती आहे.
पीडितेचे धक्कादायक दावे
पीडितेच्या म्हणण्यानुसार, पीएसआय कामठे, सानप आणि शिंदे हे अधिकारी त्यांच्या घरी आले. त्यांनी बाथरूममध्ये जाऊन इनरवेअरची तपासणी केली. अश्लील बोलणी केली. त्यानंतर तिघींनाही पोलीस ठाण्यात नेण्यात आले, जिथे चार तासांहून अधिक वेळ त्यांचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आल्याचा आरोप आहे.
पीडिता तक्रारीत म्हणते, “माझ्या कंबरेवर लाथा घातल्या, मोबाईलमधील खासगी फोटो, चॅट वाचले गेले. माझ्या जातिबद्दल अपमानास्पद भाष्य केले गेले. माझ्या बॉयफ्रेंडबद्दल अश्लील प्रश्न विचारले गेले. आणि सगळ्यात घाणेरडं म्हणजे पीएसआय कामठे माझ्या अंगावर आले, त्यांच्या हनुवटीचा स्पर्श माझ्या शरीराला झाला.”
महिला कॉन्स्टेबलचाही सहभाग?
पीडितेच्या आरोपानुसार, या प्रकरणात महिला पोलीसही निष्क्रिय राहिल्या नाहीत, तर त्या मजा घेत होत्या. त्या देखील आपल्याला विचित्र प्रश्न विचारत होत्या आणि हसत होत्या, असेही तिने सांगितले.
आता पुढे काय?
या प्रकरणामुळे पोलिस दलातील वर्तन आणि दलित महिला सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. तिन्ही मुलींनी केलेल्या आरोपांमुळे खळबळ उडाली असून, उच्चस्तरीय चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे. तक्रारीनंतर वरिष्ठ पातळीवर कारवाईची मागणी केली जात आहे. मानवाधिकार आयोग आणि अनुसूचित जाती आयोग यांचाही या प्रकरणात हस्तक्षेप होण्याची शक्यता आहे.