लोकप्रतिनिधींना निमंत्रण पाठवताना योग्य तो प्रोटोकॉल पाळला जावा; सुप्रिया सुळेंची पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे नाराजी

0
199

माणदेश एक्सप्रेस/बारामती :बारामती तालुक्यातील अंजनगाव येथे कृषी धोरण २०२० अंतर्गत ३३/११ के. व्ही. उपकेंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमास ऐनवेळी निमंत्रण देण्यावरून खासदार सुप्रिया सुळे या नाराज झाल्या आहेत. त्यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे आपली ही नाराजी व्यक्त केली आहे. लोकप्रतिनिधींना निमंत्रण पाठवताना योग्य तो प्रोटोकॉल पाळला जावा, असे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

 

शनिवारी अंजनगाव येथील महावितरणच्या ३३..११ केव्ही उपकेंद्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नियोजित उदघाटन कार्यक्रमास सुळे यांना ऐनवेळी निमंत्रण देण्यात आले.यावर सुळे यांनी नाराजी व्यक्त करीत थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीले. लोकसभा मतदार संघाचे आपण लोकप्रतिनिधी आहोत. त्यामुळे किमान २४ तास आधी निमंत्रण मिळाले, तर त्या अनुषंगाने दौऱ्याचे नियोजन करता येते त्यामुळे संबंधीत यंत्रणांनी योग्य तो प्रोटोकॉल पाळावा, असे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

 

विशेष म्हणजे आजच खासदार सुळे यांचा बारामती तालुका दौरा सुरू आहे. अंजनगाव येथील कार्यक्रमाबाबत त्यांना आधीच कल्पना असती, तर त्यानुसार त्यांच्या दौऱ्याचे नियोजन करता आले असते, हेही त्यांनी आपल्या पत्रातून लक्षात आणून दिले असून हेच पत्र त्यांनी जिल्हाधिकारी आणि महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना पण पाठवले आहे.