
माणदेश एक्सप्रेस न्यूज | विशेष :
लांबसडक, काळेभोर, घनदाट व निरोगी केस ही प्रत्येकाचीच इच्छा असते. परंतु प्रदूषण, ताणतणाव, चुकीचे आहार-विहार यामुळे केसगळती, अकाली केस पांढरे होणे, कोंडा, केस पातळ होणे अशा समस्या वाढत चालल्या आहेत. शॅम्पू, कंडिशनर वापरून केसांचा सौंदर्याभास काही काळ टिकतो, पण केसांचे खरे आरोग्य टिकवण्यासाठी मसाज आवश्यक असतो. केसांना आतून पोषण मिळावे यासाठी तेलाने मसाज करणे ही आपल्याकडे जुनी पद्धत आहे. मात्र आता ‘पोटली मसाज’ हा एक नवा व नैसर्गिक उपाय ट्रेंडिंग ठरत आहे.
बॉलिवूडमधील दीपिका पदुकोण आणि कतरीना कैफ यांसारख्या आघाडीच्या अभिनेत्रींची न्यूट्रिशनिस्ट श्वेता शहा यांनी याबाबत खास टिप सांगितली आहे. त्यांच्या मते, आयुर्वेदिक आणि घरगुती साहित्य वापरून तयार केलेल्या पोटलीने केसांना मसाज केल्यास केसांचे आरोग्य सुधारते, समस्या दूर होतात व केस अधिक मजबूत, मऊ व चमकदार दिसतात.
केसांसाठी आयुर्वेदिक पोटली तयार करण्यासाठी लागणारे साहित्य:
कपभर कडीपत्त्याची पाने
२ ते ३ टेबलस्पून मेथी दाणे
१ कप सुकं खोबरं
मूठभर कांद्याच्या साली
१ कप सैंधव मीठ
पोटली तयार करण्याची पद्धत:
१. एका तव्यावर मध्यम आचेवर कडीपत्ता, मेथी दाणे, खोबरं, कांद्याच्या साली व सैंधव मीठ हे सर्व घटक १-२ मिनिटे गरम करून घ्या.
२. मग हे सर्व साहित्य स्वच्छ कॉटनच्या कापडात घालून घट्ट पोटली बांधा.
३. ही पोटली पुन्हा एकदा तव्यावर १-२ मिनिटे गरम करून घ्या.
पोटली मसाज करण्याची पद्धत:
गरम पोटली हलक्या हाताने केसांच्या मुळांवर दाबत दाबत मसाज करा.
स्कॅल्पला सोसवेल इतपतच पोटली गरम ठेवा.
हा मसाज १०-१५ मिनिटे केल्यास त्याचे उत्तम परिणाम दिसतात.
पोटली मसाजचे फायदे:
१. कडीपत्ता – केसगळती कमी करतो, अकाली केस पांढरे होण्यास प्रतिबंध करतो.
२. मेथी दाणे – केसांतील कोंडा कमी करून मुळांना मजबुती देतात.
३. सुकं खोबरं – केसांना नैसर्गिक ओलावा देऊन मऊ व चमकदार बनवते.
४. कांद्याच्या साली – केसांचा नैसर्गिक रंग टिकवतात, वाढीस चालना देतात.
५. सैंधव मीठ – स्कॅल्प स्वच्छ ठेवून रक्ताभिसरण सुधारते, मुळांना बळकट करते.
तज्ज्ञांचे मत
श्वेता शहा यांच्या मते, नियमित पोटली मसाज केल्यास केसांच्या समस्या जसे की केसगळती, केस पातळ होणे, अकाली पांढरे होणे या कमी होतात. तसेच स्कॅल्प रिलॅक्स होतो आणि रक्ताभिसरण सुधारल्यामुळे केसांची वाढ वेगाने होते.
👉 आजीबाईंच्या बटव्यातील हा सोपा आणि नैसर्गिक उपाय आधुनिक काळातही तितकाच उपयुक्त आहे. सौंदर्यप्रसाधनांपेक्षा आयुर्वेदिक व घरगुती उपायांवर भर दिल्यास केसांचे खरे सौंदर्य टिकवून ठेवणे शक्य आहे.