
माणदेश एक्सप्रेस न्यूज | सांगली : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी वेगाने सुरू झाली असून, सांगली जिल्ह्यातही प्रशासकीय हालचालींना गती मिळाली आहे. ग्रामविकास विभागाने जिल्हा व तालुकानिहाय लोकसंख्येची माहिती तातडीने मागवली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून समजते.
शुक्रवारी रात्री उशिरा शासनाचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाले. त्यानुसार, जिल्हा परिषदेतील सदस्यसंख्या निश्चित करण्यासाठी ही माहिती महत्त्वाची ठरणार आहे. त्यानंतर पंचायत समित्यांची सदस्यसंख्या ठरेल.
बदललेली प्रशासकीय रचना महत्त्वाची
गेल्या काही वर्षांत ग्रामपंचायतींचे विभाजन, तालुका बदल, शहरी भागात समावेश, पुनर्वसनामुळे नव्या ग्रामपंचायतींची निर्मिती अशा अनेक बदलांमुळे अद्ययावत लोकसंख्या माहितीची गरज भासली आहे. २०११ नंतर जनगणना झाली नसल्यामुळे सध्याची लोकसंख्या ३० लाखांहून अधिक असल्याचा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. २०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या २८ लाख २२ हजार १४३ होती.
प्रभागरचनेसाठी आयोगाचे पत्र
निवडणूक प्रक्रियेसाठी पुढील टप्पे ठरवण्यात आले आहेत. त्यामध्ये: सदस्यसंख्या निश्चित करणे,प्रारूप प्रभागरचना जाहीर करणे,हरकती व सूचना मागवणे,सुनावणी करून अंतिम प्रभागरचना प्रसिद्ध करणे,आरक्षणासाठी सोडत काढणे,मतदार यादी व निवडणूक कार्यक्रम घोषित करणे,ही संपूर्ण प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.
डिसेंबर २०२१ पासून प्रशासक राज
ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांची मुदत संपली आहे, त्या ठिकाणी डिसेंबर २०२१ पासून प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली होती. न्यायालयीन प्रक्रियेमुळे निवडणुका रखडल्या होत्या. आता चार आठवड्यांत निवडणूक अधिसूचना जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तालुकानिहाय २०११ ची लोकसंख्या (प्रमुख तालुके):
मिरज – ८,५४,५८१
वालवा – ४,५६,००२
जाट – ३,२८,३२४
तासगाव – २,५१,४०१
खानापूर – १,७०,२१४
पलूस – १,६४,९०९
शिराळा – १,६२,९११
कवठेमहांकाळ – १,५२,३२७
कडेगाव – १,४३,०१९
आटपाडी – १,३८,४५५
निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीला चालना मिळाल्याने लवकरच जिल्ह्यात निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे.