
शेतकऱ्यांचे नुकसान : तातडीने मदतीची मागणी
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी (प्रतिनिधी) : आटपाडी तालुक्यातील विविध भागांमध्ये काल दिनांक १३ मे रोजी सायंकाळी वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह जोरदार मान्सूनपूर्व पावसाने धडक दिली. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, काढणीला आलेले मका पीक आडवे होऊन जमीनदोस्त झाले आहे. तसेच आंबा फळांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून, शेतकऱ्यांची एकच धावपळ उडाली आहे.
काल दुपारी ३ वाजेपासूनच वातावरणात बदल जाणवत होता. आभाळ भरून आले होते व ढगांचा गडगडाट सुरू झाला होता. सायंकाळी अचानक वाऱ्याचा वेग वाढला आणि जोरदार पावसाने परिसरात हजेरी लावली. वाऱ्याचा वेग एवढा होता की काही भागात झाडांची तोडफोड झाली, विजांच्या कडकडाटाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.
या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका मका पिकाला बसला आहे. काढणीस आलेला मका पाऊस आणि वाऱ्यामुळे आडवा झाला आहे. अनेक शेतांमध्ये मका पूर्णतः जमिनीवर लोळताना दिसत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच, शेतातील गुराढोऱ्यांची तारांबळ उडाली. वाऱ्याच्या झंझावातात गुरे उघड्यावर झोडपली गेली. काही ठिकाणी आंब्याची फळे झाडांवरून गळून पडली, ज्यामुळे बागायतदारांचेही मोठे नुकसान झाले आहे.
पंचनामे करून नुकसानभरपाई द्या
या अचानक आलेल्या नैसर्गिक आपत्तीतून सावरण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाईची मागणी केली आहे., “आमचं हाती आलेलं पीक उध्वस्त झालं आहे. आता सरकारने तात्काळ मदतीचा हात द्यावा.”
श्री. विष्णू महादेव पुजारी
शेतकरी, आंबेवाडी