विकी कौशलच्या आगामी ‘छावा’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाय. ‘छावा’ सिनेमाच्या ट्रेलरमुळे सिनेमाची उत्कंठा आणखी शिगेला पोहोचली आहे. ३ मिनिटं ८ सेकंदांच्या या ट्रेलरमध्ये विकी कौशलचा छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दमदार अभिनय दिसतोय. या ट्रेलरमध्ये अनेक कलाकार दिसत आहेत. याशिवाय औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्नाची दहशतही पाहायला मिळतेय.
विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेल्या ‘छावा’ सिनेमाच्या ट्रेलरमध्ये सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांचा मुकुट बघायला मिळतो. शेर नही रहा लेकिन छावा जिंदा है! अशी वाक्य ऐकायला मिळतात. नंतर शंकराच्या पिंडीवर जलाभिषेक करुन पूजा करणारे संभाजी महाराज पाहायला मिळतात. पुढे संभाजी महाराजांच्या शौर्य, पराक्रमाची गाथा पाहायला मिळते. दुसरीकडे औरंगजेब संभाजी महाराजांना रोखण्यासाठी योजना आखताना दिसतो. ३ मिनिटं ८ सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये विकी कौशलचा दमदार अभिनय बघायला मिळतोय.
विकी कौशल, रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना यांची प्रमुख भूमिका असलेला ‘छावा’ सिनेमा १४ फेब्रुवारी २०२५ ला रिलीज होतोय. सिनेमाचा ट्रेलर भव्यदिव्य असून छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. या सिनेमात छत्रपती शिवरायांची भूमिका कोण साकारणार, याविषयी अजून उलगडा झाला नाही. तरी या सिनेमात बॉलिवूडमधील अनेक कलाकारांची झलक बघायला मिळतेय. ‘छावा’ सिनेमाचा ट्रेलर इतका दमदार आहे, त्यामुळे सिनेमाही छानच असेल यात शंका नाही.