
माणदेश एक्सप्रेस न्यूज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीतील डाळिंब सौद्यांमध्ये विक्रमी दराची नोंद झाली असून, यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. मंगलमूर्ती फ्रुट सप्लायर्सच्या अडतीवर विक्रीस आलेल्या डाळिंबाला चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी फटाके वाजवत आनंद साजरा केला.
श्रावण महिन्यामुळे मागणीत वाढ झाल्याने दरात चांगली उसळी आली आहे, असे मंगलमूर्ती फ्रुट सप्लायर्सचे चेअरमन मा. पंढरीनाथ नागणे यांनी सांगितले. ते म्हणाले की, “सध्या आमच्या अडतीवर दररोज ४ ते ५ हजार क्रेट डाळिंबाची आवक होत आहे. यामध्ये केवळ आटपाडी भागातीलच नव्हे, तर सांगोला, अकलूज, नातेपुते, माळशिरस, दौड, इंदापूर, अहिल्यानगर, अक्कलकोट तसेच कर्नाटकातील विजापूर आणि बेळगाव परिसरातूनही दर्जेदार माल येत आहे.”
डाळिंबाबरोबरच ड्रॅगन, पेरू, चिकू आणि सिताफळ यांचीही दैनंदिन आवक सुरू आहे. गुणवत्तापूर्ण मालाला व्यापाऱ्यांकडून मोठी मागणी असल्याने दरात सातत्याने वाढ होत असल्याचेही नागणे यांनी नमूद केले.
लिलावात अनेक शेतकऱ्यांना उच्चांकी दर मिळाले. गुरसाळे येथील रवींद्र गायकवाड यांच्या डाळिंबाला ७२, १०२, १६४, ३११ रुपये प्रतिकिलो असा भाव मिळाला. पिलीव येथील रामचंद्र भैस यांच्या मालाला ९१, ११०, १७१, २५१ रुपये तर भगतवाडी येथील विठ्ठल फडतरे यांच्या मालाला ८०, १००, १७०, २११ रुपये असा दर मिळाला. तर ज्ञानेश्वर सूर्यवंशी यांच्या मालाला ८०, ११०, १६१, २०० रुपये प्रतिकिलो असा दर मिळाल्याची नोंद झाली.
देशभरात डाळिंब पोहोचवण्यासाठी बाहेरील बाजारपेठेत सतत संपर्क साधावा लागतो. बाहेरील व्यापाऱ्यांना आटपाडीमध्ये आकर्षित करण्यासाठी वैयक्तिक भेटी, मालाची प्रत्यक्ष पाहणी आणि दराबाबत चर्चासत्रे आयोजित केली जातात. चांगल्या मालाबरोबरच थोड्या प्रमाणात खराब किंवा डॅमेज मालालाही दर मिळावा यासाठी प्रयत्न केले जातात. नागणे यांनी सांगितले की, “बाहेरील व्यापारी वर्ग आटपाडीला यावा आणि स्थानिक शेतकऱ्यांचा माल विकत घ्यावा यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो. जास्तीचा भाव असल्याने शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, जागेवर माल विकण्याऐवजी तो थेट मार्केटमध्ये आणावा, जेणेकरून पैशांची थेट व्यवहारात खात्री राहील.”
मंगलमूर्ती फ्रुट सप्लायर्सच्या या उपक्रमाला आटपाडी बाजार समितीचेही मोलाचे सहकार्य लाभत असल्याचे नागणे यांनी सांगितले.
सध्या देशातील विविध राज्यांमध्ये दर्जेदार डाळिंबाची मागणी प्रचंड वाढली आहे. यामुळे आटपाडी, सांगोला परिसरातील शेतकरी यंदा चांगल्या भावाची अपेक्षा बाळगून आहेत. बाजारात उत्साही वातावरण असून, डाळिंबाचे दर शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात लक्षणीय वाढ घडवून आणतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
आटपाडीतील व्यापारी व शेतकरी यांच्यातील या परस्पर सहकार्यामुळे केवळ स्थानिक बाजारपेठ नव्हे, तर राष्ट्रीय स्तरावरही आटपाडी डाळिंबाची ख्याती वाढत आहे. दर्जेदार माल, योग्य दर आणि पारदर्शक व्यवहार या त्रिसूत्रीमुळेच आटपाडी बाजार समिती महाराष्ट्रातील एक महत्वाचे फळबाजार केंद्र बनले आहे.
“आटपाडी व परिसरातील सर्व शेतकरी बांधवांनी आपला माल आटपाडी बाजार समितीत आणून विकावा, ज्यामुळे त्यांना योग्य दर मिळेल आणि व्यवहारात पारदर्शकता राहील.”
श्री संतोष पुजारी
सभापती