
माणदेश एक्सप्रेस न्यूज | कडेगाव :
सोन्याच्या दागिन्यांची पॉलिश करून देतो, असा बहाणा करून जवळपास तीन लाखांचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना कडेगाव तालुक्यातील मोहिते वडगाव येथे घडली. या प्रकरणी चिंचणी–वांगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एक संशयित पोलिसांच्या ताब्यात आहे, तर त्याचे दोन साथीदार अद्याप फरार आहेत.
मंगळवारी (१६ सप्टेंबर) दुपारी सुमारे १२ वाजता मोहिते वडगाव येथे सुलोचना भिकाजी मोहिते (वय ७०) या आपल्या घरात एकट्याच होत्या. त्याचवेळी तिघे अनोळखी व्यक्ती त्यांच्या घरी आले. त्यांनी “सोने पॉलिश करून देतो” असे सांगत विश्वास संपादन केला.
सुलोचना यांनीही त्यांच्यावर विश्वास ठेवून ५६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने – बांगड्या व पाटल्या – संशयितांना दिले. दागिन्यांची किंमत तब्बल २ लाख ८० हजार रुपये इतकी होती. संशयितांनी हे दागिने त्यांच्या जवळ असलेल्या एका लिक्विडमध्ये घालण्याचा बहाणा केला. मात्र, काही वेळातच त्यांनी बनावट दागिने परत देत मूळ सोन्याचे दागिने घेऊन पसार झाले.
सुलोचना मोहिते यांनी ही बाब लक्षात आल्यानंतर तातडीने चिंचणी–वांगी पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तातडीने नाकेबंदी करून तपासाची चक्रे फिरवली. रात्री उशिरा पोलिसांना मोहिते वडगाव परिसरात फिरत असलेला एक संशयित आढळला. त्याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव दुर्गेश किसनकुमार गुप्ता (रा. म्हैसूर बाजार, जमालपूर, जि. खगडिया, बिहार) असे आहे. त्याचे साथीदार योगेश यादव आणि विकास सहा हे दोघे सध्या फरार आहेत. त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणी चिंचणी–वांगी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल घुगे आणि पोलिस उपनिरीक्षक योगेश शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. फरार आरोपींचा मागोवा घेण्यासाठी पोलिसांचे पथक तयार करण्यात आले असून लवकरच त्यांना गजाआड केले जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
ही घटना ग्रामीण भागातील वृद्ध नागरिकांना लक्ष्य करून होत असलेल्या फसवणुकीचा भाग असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीतून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारच्या अनोळखी लोकांवर विश्वास ठेवू नये, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.