
माणदेश एक्स्प्रेस न्यूज | सातारा :
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या संशयास्पद आत्महत्येच्या प्रकरणानंतर राज्यातील राजकीय आणि प्रशासनिक यंत्रणा हादरली आहे. मृत्यूपूर्वी डॉक्टरने स्वतःच्या हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पीएसआय गोपाल बदने याने चार वेळा लैंगिक अत्याचार केल्याचा आणि घरमालक प्रशांत बनकर याने मानसिक छळ केल्याचा उल्लेख केला होता. या भीषण घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले असून, आरोपींच्या शोधासाठी पोलिसांचे पथक सक्रिय झाले आहे. दोन्ही आरोपी फरार आहेत. बीड येथे डॉक्टरचा अंत्यसंस्कार शोकाकुल वातावरणात करण्यात आला.
मात्र या प्रकरणाला आता राजकीय वळण लागले आहे. ठाकरे गटाचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सत्ताधारी आमदार आणि माजी खासदारांवर गंभीर आरोप करत या प्रकरणाला नवीन दिशा दिली आहे.
दानवे म्हणाले, “या घटनेमागे केवळ वैयक्तिक अत्याचार नाही, तर एक मोठा राजकीय दबाव आहे. या महिला डॉक्टरवर वैद्यकीय रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव आणला जात होता. एफआयआर दाखल करण्यासाठी तब्बल चार-पाच तास लावले गेले. माजी खासदारांच्या पीएकडून थेट पोलिसांना फोन जात होते. रिपोर्ट बदलण्यासाठी सांगितले जात होते.”
त्यांनी पुढे स्पष्टपणे आरोप करत म्हटले, “सत्ताधारी आमदार सचिन कांबळे आणि अभिजीत निंबाळकर यांनी फलटण परिसरातील सर्व शासकीय कामात हस्तक्षेप केला आहे. प्रशासनावर या दोघांचा प्रभाव प्रचंड आहे. माजी खासदारांच्या पीएने सुद्धा पोलिसांवर दबाव आणला. हे सर्व थांबले असते, तर आज ही तरुण डॉक्टर जिवंत असती.”
दानवे म्हणाले, “ही केवळ आत्महत्या नाही, हा जीव या संपूर्ण प्रशासनाने घेतलेला आहे. या व्यवस्थेच्या बेपर्वाईमुळे आणि राजकीय दबावामुळे एका तरुणीचा बळी गेला आहे. त्या महिला डॉक्टरने काही महिन्यांपूर्वीच तत्कालीन पीआय महाडिक यांच्याकडे आपल्यावर होत असलेल्या छळाबाबत लेखी तक्रार केली होती. पण त्या तक्रारीकडे कोणीच लक्ष दिले नाही. ती तक्रार केराच्या टोपलीत टाकण्यात आली. जर त्यावेळी पोलिसांनी योग्य कारवाई केली असती, तर आज ही घटना घडलीच नसती.”
दानवे यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. “या चौकशीसाठी साताऱ्याबाहेरील, निष्पक्ष महिला अधिकारी नेमावेत. सर्व संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी. या प्रकरणातील दोषींना फासावर लटकवले पाहिजे. हा केवळ न्यायाचा प्रश्न नाही, तर महिला सुरक्षेचा प्रश्न आहे,” असे दानवे म्हणाले.
गेल्या गुरुवारी (२३ ऑक्टोबर) रात्री फलटणमधील एका लॉजमध्ये या महिला डॉक्टरचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला. तिच्या हातावर सुसाईड नोट आढळली. यात पीएसआय गोपाल बदने आणि घरमालक प्रशांत बनकर यांचा उल्लेख होता. मृत डॉक्टर काही महिन्यांपासून फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत होती. स्थानिक पोलिसांनी प्रथमतः हा आत्महत्येचा प्रकार असल्याचे नमूद केले असले, तरी आता उघड झालेल्या राजकीय दाव्यांमुळे तपासाची दिशा बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या प्रकरणानंतर भाजप, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडाला आहे. विरोधकांनी राज्यातील प्रशासनावर आणि पोलिस यंत्रणेवर तीव्र टीका केली आहे. दुसरीकडे, आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) गठीत करण्यात आले असून, घटनेचा सर्वांगीण तपास सुरू आहे.
शेवटी दानवे म्हणाले, “ही महिला डॉक्टर आपल्या कर्तव्यनिष्ठेमुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचवत होती. पण आज तिचाच जीव या व्यवस्थेच्या अन्यायामुळे गेला. तिला न्याय मिळवून देणे ही आपली जबाबदारी आहे. या प्रकरणात कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे.”
फलटणमधील या प्रकरणाने केवळ वैद्यकीय यंत्रणेतीलच नव्हे, तर राजकीय दबावाच्या सावटाखाली काम करणाऱ्या अधिकारी व्यवस्थेतील धोकादायक वास्तव पुन्हा एकदा समोर आणले आहे. आता या प्रकरणाची तपासणी उच्चस्तरीय पातळीवर कशी होते आणि आरोपींवर नेमकी काय कारवाई केली जाते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.


