
माणदेश एक्स्प्रेस न्यूज | बीड :
पाटोदा तालुक्यातील नायगाव घाटात मंगळवारी सायंकाळी एक भीषण अपघात घडला. वळणावर रापमची प्रवासी बस आणि कारची समोरासमोर धडक होऊन मोठी दुर्घटना झाली. या भीषण अपघातात थेरला (ता. पाटोदा) येथील सरपंच पुत्र मोनू चंद्रकांत राख (वय २६) याचा जागीच मृत्यू झाला. तर कारमधील आणखी दोन युवक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बीडमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
संध्याकाळी पावणेआठच्या सुमारास नायगाव घाटातील एका हॉटेलसमोर ही दुर्घटना घडली. कार व बस यांची धडक एवढी भीषण होती की, कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघातानंतर बस रस्त्याच्या खाली उतरून गेली. घटनेनंतर काही काळ परिसरात एकच गोंधळ उडाला होता.
अपघात झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कारमध्ये अडकलेल्या युवकांना बाहेर काढून मदतकार्य सुरू करण्यात आले. या अपघातात विजय सानप (२९) आणि संघर्ष बांगर (२६) हे गंभीर जखमी झाले असून तातडीने त्यांना बीड शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
मृत्यू झालेला मोनू राख हा थेरला गावातील विद्यमान सरपंचाचा मुलगा होता. तरुण वयातच त्याचा झालेला दुर्दैवी अंत गावासाठी मोठा धक्का मानला जात आहे. गावात एकाच वेळी हळहळ व शोककळा पसरली आहे.
या भीषण अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. धडक कशी झाली, याचा तपास सुरू असून बस व कार दोन्ही वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत. अपघातामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.
नायगाव घाटातील वळणावर झालेल्या या अपघाताने पाटोदा तालुका हादरला आहे. सरपंच पुत्राचा जागीच मृत्यू आणि दोन गंभीर जखमींमुळे गावात शोककळा पसरली असून अपघातग्रस्त कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.


