
माणदेश एक्सप्रेस न्यूज | पुणे
पुण्यातील महार वतनाची १८०० कोटी रुपयांची जमीन केवळ ३०० कोटी रुपयांत खरेदी केल्याचा आरोप झाल्यानंतर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या विरोधात गंभीर चर्चेला तोंड फुटले आहे. या प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, विरोधकांनी सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या व्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश दिले असून, “कोणी दोषी आढळल्यास कडक कारवाई होईल,” अशी ठाम भूमिका घेतली आहे.
मात्र, आता या प्रकरणावर पार्थ पवार यांनी स्वतःची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. “मी कोणताही घोटाळा केलेला नाही. कोणतेही चुकीचे काम केलेले नाही,” असे ते म्हणाले असून, यापुढे या विषयावर अधिक भाष्य करण्यास नकार दिला आहे.
पुण्यातील अत्यंत मौल्यवान महार वतनाच्या जमिनीचा हा व्यवहार असल्याचे सांगितले जाते. पार्थ पवार यांच्या मालकीच्या कंपनीने ही जमीन खरेदी केली आहे.
या जमिनीचे सध्याचे बाजारमूल्य सुमारे १८०० कोटी रुपये आहे.
परंतु ही जमीन फक्त ३०० कोटी रुपयांत खरेदी करण्यात आली, असा गंभीर आरोप आहे.
या व्यवहारासाठी केवळ ५०० रुपयांचे मुद्रांक शुल्क भरल्याचीही माहिती समोर आली आहे.
मुळ मालकांना विश्वासात न घेता आणि सातबारा क्लिअर न करता व्यवहार झाल्याचे आरोप करण्यात आले आहेत.
या सर्व घडामोडीनंतर मुळ जमिनमालकांनी जमीन परत मिळावी अशी मागणी केली आहे. प्रकरण समोर आल्यानंतर विरोधकांनीही सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
विरोधकांकडून सातत्याने होत असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर अखेर पार्थ पवार यांनी मौन सोडले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले —
“मी कोणताही घोटाळा केलेला नाही. कोणतेही चुकीचे काम केलेले नाही. या प्रकरणावर मी अधिक काही बोलणार नाही.”
त्यांच्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात नवीन चर्चांना उधाण आले आहे.
राज्यातील विरोधकांनी या प्रकरणावरून सरकारला लक्ष्य केले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही गंभीर दखल घेतली आहे.
“या आरोपांची चौकशी केली जाईल. कोणी दोषी आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल,” असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
त्यामुळे हे प्रकरण केवळ राजकीय नव्हे, तर कायदेशीर वादाच्या भोवऱ्यातही अडकण्याची शक्यता आहे.
या प्रकरणावर अजित पवार यांनी अद्याप एकही प्रतिक्रिया दिलेली नाही. तथापि, पार्थ पवार यांच्या बचावात्मक भूमिकेनंतर आता अजित पवार काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे प्रकरण पुढे येणे ही योगायोगाची गोष्ट नसल्याचे काहींचे मत आहे. विरोधक या मुद्यावरून एनसीपीच्या अजित पवार गटावर निशाणा साधत आहेत.
पार्थ पवार यांच्यावर झालेल्या या गंभीर आरोपांमुळे महाराष्ट्रातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
एका बाजूला चौकशीच्या हालचाली सुरू आहेत, तर दुसऱ्या बाजूला पार्थ पवार सर्व आरोप फेटाळत आहेत.
आता पुढे अजित पवार आणि सरकारची भूमिका काय राहणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.


