
माणदेश एक्सप्रेस न्यूज | बीड :
राज्यात जातीयवाद, धर्मवाद आणि समाजातल्या फूट पाडणाऱ्या प्रवृत्ती रक्तबिजासारख्या राक्षसासारख्या उभ्या राहत आहेत, असं धडाकेबाज वक्तव्य भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी भगवानगडावर दसरा मेळाव्यात केले. विजयादशमीच्या मुहूर्तावर पार पडलेल्या या मेळाव्यात मुंडेंनी भाषणातून शेतकरी, वंचित समाज तसेच जातीयवादाच्या राक्षसांविरोधात ठाम भूमिका मांडली.
“भगवानगडाचा दसरा हिरावून घेतला, आता हा मेळावाही हिरावून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. गोंधळ घालणाऱ्यांनी कितीही घोषणा दिल्या तरी पवित्र होणार नाहीत. शरम वाटली पाहिजे, तुम्ही माझी माणसं नाहीत,” अशा थेट शब्दांत मुंडेंनी गोंधळ घालणाऱ्यांना सुनावले.
त्याचवेळी त्यांनी लोकांच्या वेदनांचा उल्लेख करत, “मी शब्दांत मांडू शकत नाही. मात्र मोदीजी आणि फडणवीसजींच्यावतीने मी आश्वासन देते की शेतकऱ्यांच्या पाठी सरकार ठामपणे उभं आहे, संपूर्ण मदत मिळणार आहे,” असं आश्वासन दिलं.
नवरात्रीत देवीची पूजा करणाऱ्या मुंडेंनी आपल्या भाषणात देवीच्या शक्तीचं स्मरण केलं. “महिषासुर आणि रक्तबीजासारखा राक्षस संपवणाऱ्या देवीला आज पुन्हा प्रार्थना करते – जातीयतेचे, धर्मवादाचे राक्षस नष्ट करण्याची शक्ती दे,” अशी थेट मागणी त्यांनी देवीसमोर केली.
त्याचबरोबर त्यांनी टोमणा लगावताना म्हटलं – “हे राक्षस तुमच्या चुकीच्या निर्णयातून, संदेशातून, मेंदूत जन्माला आले आहेत. जातपात आणि धर्माच्या नावाने समाज फोडणाऱ्यांनी सावध व्हावं.”
भाषणात पंकजा मुंडेंनी समाजातील माणुसकीचा दाखला देत भावनिक उदाहरण मांडलं.
“मी एका बौद्ध कुटुंबाच्या घरी गेले, तेव्हा माझ्या वंजारा समाजातील माणसाने त्यांना राशन दिलं. कैकाडी समाजालाही मदत झाली. यातून जाती गळून पडत आहेत, माणुसकीचा धागा जोडला जातोय, हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे,” असं त्यांनी नमूद केलं.
भगवान बाबांच्या शिकवणीचं स्मरण करून त्यांनी सांगितलं – “भगवान बाबा म्हणायचे, एक एकर शेती विका पण शिका. मी तुम्हाला सांगते, दोन घास कमी खा, पण स्वाभिमानाने जगा. कुणाचे तुकडे उचलू नका, खोटे धंदे करू नका. चांगल्या माणसाचं चांगलं होतंच.”
भाषणाच्या शेवटी पंकजा मुंडेंनी शेरोशायरीतून आपल्या भावनांना आवाज दिला –
“विरासत में संघर्ष मिला है, तो जिद भी मिली है
लडने की चाहे जो भी हो, दटकर आगे बढने की
बदलू मै क्यों, मै विचारोंकी अटल चोटी हूँ
मै गोपिनाथ मुंडे की बेटी हूँ”
या मेळाव्यात आमदार धनंजय मुंडे, प्रतिमा मुंडे, महादेव जानकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या भाषणातून पंकजा मुंडेंनी जातीयवाद, धर्मवाद आणि गोंधळ घालणाऱ्यांवर थेट प्रहार करत समाजाला माणुसकीचा धागा जोडण्याचं आवाहन केलं. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याची हमी देत त्यांनी दसरा मेळावा राजकीय दृष्ट्या ऐतिहासिक ठरवला.