
माणदेश एक्सप्रेस न्यूज | पंढरपूर
पंढरपूरच्या गोपाळपूर रोडवरील पत्राशेड परिसरात आज (९ जुलै) विठ्ठल दर्शनासाठी उभारलेल्या रांगेत एक धक्कादायक घटना घडली. नागपूरहून दर्शनासाठी आलेल्या भाविकाला बीव्हीजी कंपनीच्या सुरक्षा रक्षकाने काठीने बेदम मारहाण केली. या मारहाणीत भाविक गंभीर जखमी झाला असून, दंडावर व पाठीवर जबर मार लागल्याचे निदर्शनास आले आहे.
भाविक रक्तबंबाळ; घटनास्थळी खळबळ
मारहाण इतकी जबर होती की जखमी भाविक रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर कोसळला. ही घटना पाहून रांगेत उभ्या असलेल्या इतर भाविकांत तीव्र संताप व्यक्त झाला. भाविकांनी “जय विठोबा! अन्याय सहन करणार नाही!” अशा घोषणा देत रक्षकाविरोधात जोरदार आंदोलन केलं.
मंदिर प्रशासनाचा निष्काळजीपणा?
घटनेनंतर पत्रकारांनी मंदिर समितीकडे याबाबत विचारणा केली असता, व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी उर्मटपणे पत्रकाराच्या हातून मोबाईल हिसकावून घेतला आणि ‘काय करायचं ते करा’ असा प्रत्युत्तर दिलं. त्यामुळे भाविक आणि माध्यम प्रतिनिधींमध्ये अधिकच नाराजी पसरली आहे.
सामाजिक कार्यकर्त्यांची कारवाईची मागणी
माजी नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते कृष्णा वाघमारे यांनी या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केला असून, संबंधित सुरक्षारक्षक रोहित कुंभार याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
पोलीस हस्तक्षेप व रक्षकावर कारवाई
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि संबंधित रक्षकाला तात्काळ ताब्यात घेतले. बीव्हीजी कंपनीचे व्यवस्थापक कैलास देशमुख यांनी सांगितले की, “रोहित कुंभार या सुरक्षारक्षकाला कामावरून निलंबित करण्यात आले असून, पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.”
पूर्वीही घडले आहेत असे प्रकार
या आधीही दर्शन रांगेत चार ते पाच अशा घटनांची नोंद झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे भाविकांच्या सुरक्षेसाठी नेमलेल्या सुरक्षारक्षकांकडूनच असा हिंसाचार होणे हे गंभीर मानले जात आहे.
प्रशासनाची भूमिका आणि भाविकांचा सवाल
बीव्हीजी कंपनीने असे प्रकार टाळण्यासाठी कर्मचारी प्रशिक्षणावर भर देण्याची घोषणा केली असली तरी वारकऱ्यांनी प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी केली आहे.
“ज्यांच्या कडून आपली सुरक्षा अपेक्षित असते, त्यांच्याच हातून अशी मारहाण होत असेल, तर भाविकांनी कुणावर विश्वास ठेवायचा?” असा सवाल अनेक भाविकांनी उपस्थित केला आहे.