
माणदेश एक्सप्रेस न्यूज|मुंबई : पंढरपूरची वारी – वारकऱ्यांच्या भक्तीचा महासागर, आणि महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा जिवंत अनुभव. मात्र अनेकांना व्यक्तिगत कारणांमुळे प्रत्यक्ष वारीत सहभागी होता येत नाही. अशा भाविकांसाठी एक खास भक्तिमय भेट घेऊन येत आहे स्टार प्रवाह वाहिनी – ‘माऊली महाराष्ट्राची’ या नव्या कार्यक्रमाच्या रूपाने. हा कार्यक्रम २३ जूनपासून रोज संध्याकाळी ६ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे वारीचा प्रत्येक पैलू – दिंड्या, पालख्या, भक्तीगीतं, वारकऱ्यांचे अनुभव, महिला वारकरींची भूमिका, सुश्रुषावारी, अन्नपूर्णा वारी, पर्यावरणपूरक उपक्रम आणि भक्तीने भारलेली आळंदी ते पंढरपूर ही संपूर्ण यात्रा – प्रेक्षकांना घरबसल्या अनुभवता येणार आहे.
महाराष्ट्राचे लाडके अभिनेते आदेश बांदेकर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार असून, त्यांच्यासोबत प्रेक्षकांना वारीची अनुभूती घेता येणार आहे. “वारीत याआधी सहभागी झालो आहे, पण संपूर्ण आळंदी ते पंढरपूर वारीचा प्रवास प्रथमच अनुभवतो आहे. ही केवळ यात्रा नाही, ही संतांच्या शिकवणीची, भक्तीच्या उर्जेची साक्ष आहे. ‘माऊली महाराष्ट्राची’ हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या हृदयाशी नक्कीच भिडेल,” असे आदेश बांदेकर यांनी सांगितले.
स्टार प्रवाहचे व्यवसाय प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, “वारी म्हणजे केवळ धार्मिक प्रवास नाही, तर ती महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीचा भाग आहे. ही वारी घरोघरी पोहोचवणे हे आमच्यासाठी पुण्यकर्म आहे. आदेशजींसारखा समर्पित मार्गदर्शक मिळाल्याने हा कार्यक्रम आणखी प्रभावी होणार आहे.”
‘माऊली महाराष्ट्राची’ हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या धार्मिक आणि सांस्कृतिक समृद्धीचा आरसा ठरेल, असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.