लग्नाआधीच मृत्यूची भेट; प्रियकरानेच घेटला प्रेयसीचा गळा

0
250

माणदेश एक्सप्रेस न्यूज | पालघर :
“प्रेमातून लग्न, पण वादातून मृत्यू” – पालघर जिल्ह्यातील जोहार तालुक्यात अशीच एक थरारक घटना घडली आहे. १७ वर्षीय तरुणीची तिच्याच होणाऱ्या नवऱ्याने हत्या केली. हा प्रकार मंगळवारी (२ सप्टेंबर) दुपारी बिवलधर गावात घडला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, २२ वर्षीय आरोपीचा या अल्पवयीन तरुणीवर प्रेम होता. त्यांच्या घरच्यांनीही दोघांचे लग्न ठरवले होते. आरोपी वारंवार मुलीच्या घरी भेटायला जात असे. मंगळवारी दुपारी तो तिच्या घरी गेला असता तिचे आई-वडील शेतात गेलेले होते. घरात ते दोघेच असताना काही कारणावरून त्यांच्यात वाद झाला. वाद चिघळताच आरोपीने रागाच्या भरात तिचा गळा दाबून हत्या केली.


घटना घडल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. काही वेळाने शेजाऱ्यांनी घरात पाहिले असता तरुणी मृतावस्थेत आढळली. त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. जोहार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तरुणीचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला.


या प्रकरणी जोहारचे पोलीस उपअधीक्षक समीर एस. माहेर यांनी सांगितले की, आरोपीचा शोध सुरु होता. पोलिसांनी बुधवारी त्याला अटक करण्यात यश मिळवले. त्याच्याविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.


१७ वर्षीय मुलीच्या मृत्यूमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. अल्पवयातच होणाऱ्या लग्नाला एक दुर्दैवी वळण लागले असून, ही घटना गावकऱ्यांसाठी धक्कादायक ठरली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here