
माणदेश एक्स्प्रेस न्यूज
नवी दिल्ली : “दहशतवाद्यांच्या बाबतीत पाकिस्तानी सैन्याने हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेतला, म्हणूनच…आम्ही चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्णय घेतला, असे भारतीय लष्कराचे एअर मार्शल ए. के. भारती यांनी स्पष्ट केले. ते आज (दि.१२) पत्रकार परिषदेत बोलत होते. भारतीय लष्कराच्या तिन्ही दलाची पत्रकार परिषद आज पार पडली. यावेळी तिन्ही दलाच्या प्रमुखांनी ‘ऑपरेशन सिंदूर’विषयी माहिती दिली.
एअर मार्शल ए. के. भारती पुढे म्हणाले, “आमचा लढा दहशतवाद्यांशी होता. पाक लष्कराशी नाही”. आम्हाला केवळ दहशतवादाविरोधात लढायचं होतं. मात्र पाकिस्तानी सैन्याने दहशतवाद्यांची साथ दिली. त्यामुळे आम्ही जोरदार प्रत्युत्तर देण्याचे ठरवले आणि म्हणूनच आम्ही ‘ऑपरेशन सिंदूर’ राबविले. यामध्ये झालेल्या पाकिस्तानच्या नुकसानाला तो स्वत:च जबाबदार आहे, असेही एअर मार्शल भारती म्हणाले.
पाकमधील अनेक तळांवर हल्ले करण्यात आले. पाकिस्तानने हल्ल्यामध्ये वापरलेले असंख्य ड्रोन आणि मानवरहित लढाऊ हवाई वाहनांना स्वदेशी विकसित केलेल्या सॉफ्ट अँड हार्ड किल काउंटर-यूएएस सिस्टीम आणि प्रशिक्षित भारतीय हवाई संरक्षण प्रणालीने पाडले. भारताने पाकिस्तानी ड्रोन लेझर गनने पाडल्याचेही यावेळी सांगण्यात आले. आपली एअर डिफेन्स सिस्टम नष्ट करणे पाकिस्तानला अशक्य आहे, असे स्पष्ट केले.
हवाई संरक्षण यंत्रणेने चीन निर्मित पीएल-१५ क्षेपणास्त्र कसे पाडले? याबाबत बोलताना डीजी एअर ऑपरेशन्स एअर मार्शल ए. के. भारती यांनी सांगितले की, पीएल-१५ क्षेपणास्त्राचे लक्ष्य चुकले. आणखी एक सापडलेले शस्त्र म्हणजे लांब पल्ल्याचे रॉकेट. हे सर्व आमच्या प्रशिक्षित क्रू आणि हवाई संरक्षण प्रणालीने पाडले आहे.
डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई म्हणतात, “गेल्या काही वर्षांत दहशतवादी कारवायांचे स्वरूप बदलले आहे. निष्पाप नागरिकांवर हल्ले होत होते. पहलगाम हल्ल्यापर्यंत दहशतवादी आणि त्यांचे समर्थन करणाऱ्या पाकिस्तानच्या ‘पापांचा घडा भरला होता, म्हणूनच ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले.
पुढे भारतीय लष्कराचे DGMO (डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स) लेफ्टनंट जनरल राजीव घई म्हणाले की, “आमच्या हवाईतळांवर किंवा लॉजिस्टिक यंत्रणांवर हल्ला करणे फारच कठीण आहे.” या संवादात त्यांनी क्रिकेटचा संदर्भ देत एका सूचक उदाहरणाचा उल्लेख देखील केला. ते म्हणाले, “मी ऐकलं की विराट कोहलीने नुकतीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तो माझा आवडता खेळाडू आहे.
पुढे ते म्हणले, ” १९७०च्या दशकात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातल्या अॅशेस मालिकेत दोन ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी इंग्लंडची फलंदाजी अक्षरशः उध्वस्त केली होती. त्यावेळी ऑस्ट्रेलियाकडून एक म्हण दिली गेली होती. “राख ते राख, धूळ ते धूळ — जर थॉम्सनने तुला बाद केलं नाही, तर लिली नक्कीच करेल”. जर तुम्ही या विधानामागची खोली समजून घेतली, तर मी काय म्हणतोय ते तुमच्या लक्षात येईल. तू जरी एकामागून एक सगळे थर पार केलेस, तरी या संपूर्ण जाळीप्रणालीतला एखादा थर तुला नक्की गाठेल.”त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट संकेत मिळत आहेत की, भारतीय लष्कराच्या बहुस्तरीय सुरक्षा यंत्रणेचा भेद करणे कोणत्याही शत्रूसाठी सोपे नाही”.
उप-अॅडमिरल ए.एन. प्रमोद पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले, “अनेक सेन्सर्स आणि माहिती स्रोतांचा प्रभावी वापर करून, आम्ही सातत्याने देखरेख ठेवत आहोत. उद्भवणाऱ्या किंवा दिसून येणाऱ्या कोणत्याही धोक्याचा प्रभाव कमी करण्यासाठी किंवा त्याचा नायनाट करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, आणि लांब पल्ल्यावरील अचूक लक्ष्य भेद सुनिश्चित करत आहोत”. हे सर्व उपाययोजना एक व्यापक आणि प्रभावी ‘लेयर्ड फ्लीट एअर डिफेन्स’ यंत्रणेअंतर्गत राबवले जात आहेत, जी कोणत्याही प्रकारच्या धोक्यांचा सामना करू शकते — मग ते ड्रोन असोत, अति वेगवान क्षेपणास्त्रं असोत किंवा लढाऊ विमाने व निगराणी करणारी विमाने असोत.