
माणदेश एक्सप्रेस न्युज | मुंबई :
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यात राजकीय वादळ उठले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्यावर पडळकर यांनी केलेल्या आक्षेपार्ह टीकेवरून वातावरण तापले असून या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटत आहेत.
या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून तीव्र नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे.
पडळकरांच्या भाष्याबाबत फडणवीसांशी संवाद साधताना शरद पवारांनी,
“अशी बेताल वक्तव्ये करणे अजिबात योग्य नाहीत.”
“खालच्या पातळीवर जाऊन विरोधकांची खिल्ली उडवणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही.”
“अशा वाचाळवीरांना आटोक्यात आणा,”
असा थेट इशारा मुख्यमंत्र्यांना दिल्याचे वृत्त आहे.
जयंत पाटील यांचा अपमान करणाऱ्या वक्तव्यामुळे शरद पवार गटात प्रचंड नाराजी आहे. पक्षाच्या जिल्हा व तालुका पातळीवरील कार्यकर्त्यांत संतापाची लाट पसरली असून ठिकठिकाणी मोर्चे, निषेध आणि आंदोलनाची तयारी सुरू असल्याची माहिती मिळते.
राष्ट्रवादी नेत्यांचे म्हणणे आहे की –
“राजकारणात टीका आणि भूमिका वेगळी असू शकते. पण कुटुंबाचा अपमान करत, एकेरी शब्द वापरणं ही महाराष्ट्राच्या राजकारणातील दुर्दैवी बाब आहे. हे असभ्य राजकारण आहे आणि त्याला आळा बसलाच पाहिजे.”
एका कार्यक्रमात बोलताना पडळकरांनी जयंत पाटील यांचा थेट एकेरी उल्लेख करत अत्यंत अशोभनीय शब्द वापरले. एवढेच नव्हे तर पाटलांच्या वडिलांचाही उल्लेख करून अपमानास्पद भाषा केली.
“अरे जयंत पाटला तुझ्यासारखा भिकारी अवलाद गोपीचंद पडळकरची नाही. माझ्यात कार्यक्रम करायची धमक आहे. ये कार्यक्रम पाहायला, तुझे डोळे दिपून जातील,”
असे पडळकर म्हणाले.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने संताप आणखी भडकला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्यातील संघर्ष चांगलाच गाजतोय. दोन्ही नेते सतत एकमेकांवर टीका करत आहेत. मात्र यावेळी पडळकरांनी वापरलेली भाषा खालच्या पातळीवरील असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने तीव्र आक्षेप घेतला आहे.
पडळकरांवर कारवाईबाबत राष्ट्रवादी गट आक्रमक झाला आहे.
पक्षाच्या नेत्यांनी आंदोलनाची हाक दिली आहे.
शरद पवारांच्या हस्तक्षेपामुळे आता भाजप आणि सरकारवर पडळकरांविषयी भूमिका स्पष्ट करण्याचा दबाव आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांचा प्रतिसाद काय येतो, याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
एकंदरीत, पडळकरांच्या बेताल वक्तव्यामुळे निर्माण झालेला वाद आता भाजप-राष्ट्रवादी संघर्षाचं नवं पर्व ठरतोय.