फडणवीसांच्या तंबीनंतरही पडळकर आक्रमकच; जयंत पाटलांवर पुन्हा वादग्रस्त टीका

0
330

माणदेश एक्सप्रेस न्यूज | सांगली :

सांगलीतील दसरा मेळाव्यात आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करत राजकीय वातावरण ढवळून काढले आहे.

राज्यातील राजकारण गेल्या काही दिवसांपासून पाटील–पडळकर वादामुळे तापले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पडळकरांना अशा वैयक्तिक टीकाटिप्पणीतून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. मात्र या तंबीला न जुमानता पडळकर यांनी जयंत पाटलांवर थेट नाव घेऊन आणखी आरोपांची सरबत्ती केली.


पडळकर यांनी आपल्या भाषणात,

“जयंत पाटील हे राजारामबापूंची औलाद नाहीत, असे मी म्हटले आणि ते खरे आहे. माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ लावला जात आहे. मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे, माघार घेणार नाही,”
असे स्पष्टपणे सांगितले.

यावरच थांबता न पडळकरांनी पाटलांना थेट ‘मंगळसूत्र चोर’ असे संबोधले. “तुम्ही मला ‘गोप्या’ म्हणता, तर मी तुम्हाला ‘जंत्या’ म्हणतो,” अशा शब्दांत त्यांनी प्रत्युत्तर दिले. पाटलांनी आव्हान दिल्यास कुठल्याही मंचावर येण्याची तयारी असल्याचेही पडळकर म्हणाले.


राजकीय क्षेत्रात नेत्यांवरील अशा वैयक्तिक टिप्पणींमुळे वातावरण अधिकच दूषित होत असल्याची चर्चा रंगली आहे. “राजकारणातील स्तर दिवसेंदिवस खालावत आहे. वैयक्तिक टीकाटिप्पणी, नावं ठेवणे, अपमानास्पद संबोधन हा लोकशाहीला शोभणारा मार्ग नाही,” अशी प्रतिक्रिया विविध समाजघटकांतून उमटू लागली आहे.

काही राजकीय जाणकारांच्या मते, शेतकरी व जनतेच्या वास्तविक प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्यासाठी अशा वादग्रस्त वक्तव्यांचा आधार घेतला जात आहे. “महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न, ओल्या-दुष्काळाचे संकट, रोजगार या खऱ्या मुद्यांवर चर्चा व्हावी, परंतु ती बाजूला सारून वैयक्तिक चिखलफेक केली जाते,” असा सूर मतप्रवाहातून उमटत आहे.


पडळकरांच्या या भूमिकेमुळे पाटील समर्थक आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, जयंत पाटील यांनी पडळकरांच्या वक्तव्याला फारसे महत्त्व न देत, “आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरच बोलणार,” असे स्पष्ट केले आहे. मात्र पडळकर यांनी सातत्याने त्यांच्यावर हल्ले चढवल्याने आगामी काळात हा वाद आणखी चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.


राजकीय वर्तुळात पडळकरांचा आक्रमकपणा आणि फडणवीसांच्या तंबीची उघडपणे केलेली दखल न घेणे, हेच चर्चेचे प्रमुख कारण ठरत आहे. सध्या तरी या वादामुळे सांगली जिल्ह्यातील वातावरण तापले असून, राज्यभरात या मुद्द्यावरून चांगलीच खळबळ माजली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here