शेजारचा बांग्लादेश हिंसाचारामध्ये होरपळतोय. नोकरीमधील आरक्षणाच्या मुद्यावरुन हा हिंसाचार सुरु आहे. नोकरीमधील आरक्षण संपवण्याच्या मागणीसाठी सुरु असलेलं हे आंदोलन उग्र बनलं आहे. पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. आंदोलक आणि सत्तारुढ पार्टीच्या समर्थकांमध्ये हिंसाचार सुरु आहे. या हिंसेमध्ये रविवारी 14 पोलिसांसह 100 जणांना आपल्या प्राणांना मुकाव लागलं. शेकडो जखमी झाले आहेत. परिस्थिती इतकी खराब आहे की, देशात अनिश्चित काळासाठी कर्फ्यू लावावा लागला आहे. इंटरनेट बंद करण्यात आलय.
सरकारी नोकऱ्यांमधील कोटा प्रणाली संपवण्याच्या मागणीसाठी बांग्लादेशात बऱ्याच दिवसांपासून विद्यार्थ्यांच आंदोलन सुरु आहे. रविवारी या आंदोलनाने उग्र रुप घेतलं. आंदोलक म्हणतात, आता आमची एकच मागणी, पीएम शेख हसीना यांचा राजीनामा. बांग्लादेशातील प्रमुख वर्तमानपत्र प्रोथोम अलो आपल्या बातमीत म्हटलय की, देशभरात हिंसक झडप, गोळीबार आणि प्रत्युत्तराच्या कारवाईत आतापर्यंत 100 लोक मारेल गेलेत. पोलीस मुख्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशभरात 14 पोलिसांचा मृत्यू झालाय. यात सिराजगंज इनायतपुर या एकाच पोलीस ठाण्यातील 13 पोलिसांची हत्या करण्यात आली. 300 पोलीस जखमी आहेत.
किती भयानक परिस्थिती
बांग्लादेशात या मुद्यावरुन अनेकदा हिंसाचार झाला आहे. 1971 च्या स्वातंत्र्य संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांच्या नातेवाईकांसाठी सरकारी नोकरीमधील 30 टक्के आरक्षण समाप्त करावे, ही आंदोलकांची मुख्य मागणी आहे. आधी हिंसाचार भडकलेला, तेव्हा कोर्टाने कोट्याची मर्यादा कमी केलेली. आता प्रदर्शनकारी शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.आतापर्यंत 11,000 पेक्षा अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. आंदोलकांनी पोलीस स्टेशन, सत्तारुढ पक्षाच कार्यालय आणि त्यांच्या नेत्यांच्या घरावर हल्ले केले आहेत. अनेक वाहनं जाळली. सरकारने मेटा प्लेटफॉर्म फेसबुक, मॅसेंजर, व्हाट्सएप आणि इंस्टाग्राम बंद करण्याचे आदेश दिलेत.