
माणदेश एक्सप्रेस न्यूज | १ ऑगस्ट २०२५
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात NIA न्यायालयाने नुकतीच सर्व ७ आरोपींना निर्दोष मुक्त केले. या निर्णयानंतर आता या प्रकरणातील माजी एटीएस निरीक्षक मेहबूब मुजावर यांनी एक धक्कादायक खुलासा करत देशाचे लक्ष वेधले आहे. त्यांनी दावा केला की, त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना अटक करण्याचे मौखिक आदेश देण्यात आले होते.
“भगवा दहशतवाद सिद्ध करण्यासाठी भागवत यांना अडकवायचे होते”
मुजावर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “माझ्यावर दबाव होता की मोहन भागवत यांना अटक करा. ‘भगवा दहशतवाद’ सिद्ध करण्यासाठी हा डाव रचला जात होता.”
त्यांनी नाव घेत म्हणाले की, “तत्कालीन तपास अधिकारी परमबीर सिंग आणि त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे मौखिक आदेश दिले होते.” मात्र मी यामध्ये सहभागी होण्यास नकार दिला, असेही त्यांनी स्पष्ट केले.
“संदीप डांगे व रामजी कलसांगरा मृत असूनही, चार्जशीटमध्ये दाखवले जिवंत”
मुजावर पुढे म्हणाले की, “संदीप डांगे आणि रामजी कलसांगरा हे मृत होते, तरीही त्यांना चार्जशीटमध्ये जिवंत दाखवले गेले.”
ते पुढे म्हणाले, “मी विरोध केला तेव्हा माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करून निलंबित करण्यात आले. पण आता NIA न्यायालयाच्या निकालामुळे सत्य समोर आले आहे.”
“सुशीलकुमार शिंदेंनी स्पष्टीकरण द्यावे”
मुजावर यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, “हिंदू दहशतवादाचा उल्लेख करून देशाला गोंधळात टाकणाऱ्यांनी आता जबाबदारी घ्यावी आणि खुलं स्पष्टीकरण द्यावं.”
“माझा संघर्ष सत्यासाठी होता”
मेहबूब मुजावर यांनी भावनिक स्वरात सांगितले, “मी फक्त सत्यासाठी लढलो. म्हणूनच माझं निलंबन, खटले हे सगळं सोसलं. पण मी कुणावर खोटा आरोप केला नाही.”
“आज न्यायालयाने माझ्या संघर्षावर शिक्कामोर्तब केलं आहे.”
पार्श्वभूमी : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण
२९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगाव येथे दुचाकीवर लावलेल्या बॉम्बच्या स्फोटात ६ जण ठार झाले होते आणि १०० हून अधिक लोक जखमी झाले होते.
या प्रकरणात साध्वी प्रज्ञासिंह, कर्नल पुरोहित आदींना आरोपी करण्यात आले होते. सुरुवातीला ATS, नंतर NIA या प्रकरणाचा तपास करत होती. अखेर १७ वर्षांनंतर, ३१ जुलै २०२५ रोजी NIA विशेष न्यायालयाने सर्व ७ आरोपींना निर्दोष घोषित केले.