
माणदेश एक्सप्रेस न्यूज | मुंबई
राज्यातील राजकारण पुन्हा एकदा गरमावलं आहे. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वादग्रस्त विधानांमुळे सत्ताधारी महायुती अडचणीत आली आहे. याच पार्श्वभूमीवर आज मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अँटी-चेंबरमध्ये प्री-कॅबिनेट बैठक झाली. या बैठकीत कोकाटेंना थेट खडसावत अजितदादांनी नाराजी व्यक्त केली.
अजित पवारांची ताशेरेबाजी
प्री-कॅबिनेट बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. “तुमच्या विधानांमुळे सरकारची प्रतिमा मलिन होत आहे. किती वेळा वाचवायचं, किती वेळा माफ करायचं?” असा थेट सवाल त्यांनी कोकाटेंना केला. त्यांनी सर्व मंत्र्यांना माध्यमांशी बोलताना भान ठेवण्याचे निर्देश दिले.
कोकाटेंवर कारवाई की समज?
सूत्रांच्या माहितीनुसार, कोकाटेंवर कारवाई व्हावी अशी मागणी होत असली तरी अजित पवारांनी शिवसेनेच्या मंत्र्यांवर आधी कारवाई झाली तरच राष्ट्रवादीचे मंत्रीही जबाबदार ठरतील, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे कोकाटेंचा राजीनामा घेतला जाणार की नाही, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, कोकाटे यांना संधी द्यावी, त्यांचं काम चांगलं आहे, अशी शिफारस काही मंत्र्यांनी अजित पवार यांच्याकडे केली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कोकाटेंना फक्त समज देण्यात येणार असून राजीनामा सध्या टळण्याची शक्यता आहे.
वादग्रस्त विधानांमुळे अडचणीत
माणिकराव कोकाटे हे सातत्याने वादग्रस्त विधानांनी चर्चेत आहेत. कृषी मंत्री पद हे “ओसाड गावाची पाटलकी” असल्याचं विधान, ढेकळांचा विमा देण्यावरून केलेली टिप्पणी, पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेत रमी खेळत असल्याचा आरोप अशा अनेक प्रकरणांमुळे ते विरोधकांच्या निशाण्यावर आहेत.
मंत्रिमंडळ बैठकीसाठी रवाना
अजित पवार आणि कोकाटेंमधील बैठक संपल्यानंतर, माध्यमांशी न बोलताच दोघेही थेट मंत्रिमंडळ बैठकीसाठी रवाना झाले. त्यामुळे आजच्या बैठकीत कोकाटेंच्या भवितव्याबाबत कोणता निर्णय घेतला जातो, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.