
माणदेश एक्सप्रेस न्यूज | पुणे :
ऑनलाइन गुंतवणुकीच्या नावाखाली पिंपरी-चिंचवडमधील एका व्यक्तीची तब्बल १५ लाख ३३ हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. दिघी परिसरात २३ नोव्हेंबर २०२४ ते ३ जानेवारी २०२५ या कालावधीत ही घटना घडली.
या प्रकरणी संदीप सुभाष शर्मा (वय ४९, रा. विजयनगर, दिघी) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तींविरोधात दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी शर्मा हे एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील झाल्यानंतर ‘आर्या आनंद’ नावाच्या महिलेने त्यांच्याशी संपर्क साधला. तिने स्वतःला गुंतवणुकीचे मार्गदर्शन करणारी म्हणून ओळख करून दिली. तिच्या सल्ल्यानुसार शर्मा यांनी दिलेल्या विविध बँक खात्यांमध्ये हप्त्याने एकूण १५ लाख ३३ हजार रुपये जमा केले.
सुरुवातीला शर्मा यांच्या मोबाईल ॲपमध्ये एक कोटी २१ लाख रुपयांचा नफा दाखवण्यात आला. यामुळे ते गुंतवणुकीतून मोठा फायदा होत असल्याच्या विश्वासात आले. मात्र, जेव्हा त्यांनी तो नफा आपल्या खात्यात काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तो ब्लॉक झाल्याचे दिसले.
यानंतर संशयितांनी शर्मा यांना नफा काढण्यासाठी २४ लाख २२ हजार २७९ रुपये सेवा शुल्क भरण्यास सांगितले. मात्र, फिर्यादीकडे एवढी रक्कम उपलब्ध नसल्याने त्यांनी पैसे भरण्यास नकार दिला. त्यानंतर संशयितांनी त्यांच्याशी सर्व संपर्क तोडला. यानंतर आपली मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले.
या प्रकारामुळे धक्का बसलेल्या शर्मा यांनी थेट दिघी पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तींविरोधात फसवणूक, माहिती तंत्रज्ञान कायद्यासह विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
अलीकडच्या काळात गुंतवणुकीच्या नावाखाली ऑनलाइन फसवणुकीच्या घटना झपाट्याने वाढत आहेत. विशेषत: व्हॉट्सॲप, टेलिग्राम किंवा अन्य सोशल मीडियाच्या माध्यमातून अनोळखी लिंक आणि गुंतवणुकीचे आमिष दाखवून अनेकांना लाखो रुपयांना गंडवले जात आहे. पोलिसांनी नागरिकांना अशा प्रकारच्या संदेशांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.