सांगलीत धारदार शस्त्राने एकाचा खून, दोघांना अटक

0
371

माणदेश एक्सप्रेस/सांगली : पोलीस दप्तरी गुन्हेगार म्हणून नोंद असलेल्या समीर नदाफ याचा धारदार हत्याराने वार करून खून करणाऱ्या दोन संशयितांना २४ तासांत गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मंगळवारी गजाआड केले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.

 

समीर नदाफ (वय ४१ रा. खारे मळा, कुपवाड) याचा काल रात्री औद्योगिक वसाहत ते सावळी रस्त्यावरील रस्ते परिवहन विभागाच्या कार्यालयाजवळ धारदार हत्याराने खून करण्याचा प्रकार सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडला होता. या खूनप्रकरणी सोहेल सलीम काझी (वय ३०, रा. खारे मळा) आणि सोहेल उर्फ साबीर शरीफ मुकादम (वय २६ रा. बडेपिर कॉलनी, मिरज रोड) या दोघा संशयितांना पोलिसांनी आज अटक केली.

 

या घटनेबाबत माहिती देताना निरीक्षक शिंदे यांनी सांगितले, संशयितांनी मृत समीर यास दारू पिण्यासाठी बोलावून घेतले. दारू पित असताना वाद करून त्याच्या छातीवर, पोटावर, डोकीत धारदार हत्याराने वार केले. गंभीर जखमी स्थितीत त्याला घटनास्थळी सोडून पलायन केले. याबाबत कुपवाड पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमी नदाफ याला रुग्णालयात उपचारासाठी हलवले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

 

संशयित आरोपी काझी याची पानपट्टी असून मृत नदाफ हा कायम पानपट्टीवर येऊन मावा, सिगारेट घेऊन पैसे न देता जात होता. पैसे मागितले तर दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी देत होता. त्याचा राग काझीच्या मनात होता. काल रात्री पाण्याच्या टाकीजवळ काझी व मुकादम उभे असता नदाफ याने दारूसाठी पैशाची मागणी केली. त्यावेळी दारू पिण्यास जाऊया असे सांगत परिवहन विभागाच्या कार्यालयाजवळ नेऊन त्याच्यावर धारदार हत्याराने वार करत त्याचा खून केला. या प्रकरणी कुपवाड औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here