
माणदेश एक्स्प्रेस/मुंबई : राज्यात विधानसभेची निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीला घवघवीत यश मिळाले आहे. या निवडणुका पार पडल्यानंतर आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे. या निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरूवात केली असून सर्व शक्यतांचा विचार केला जात आहे. यादरम्यान मुंबई महापालिकेची निवडणूक भारतीय जनता पक्ष हा स्वबळावर लढणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात होताना दिसत आहे. यासाठी भाजपाने चाचपणी देखील सुरू केल्याचे बोलले जात आहे. यादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजपाचे दिग्गज नेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी याबद्दल भाष्य केले आहे.
आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपा स्वतंत्र उमेदवार उभे करणार का? की महायुती म्हणूनच ही निवडणूक लढवली जाईल याबद्दल फडणवीस यांना एका मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला होता. शिवसेना (शिंदे) आणि भाजपा यांच्यात अंतर्गत वाद सुरू असल्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांना यासंबंधी प्रश्न विचारण्यात आला. यावेळी फडणवीसांनी या सर्व राजकीय चर्चांना पूर्णविराम देत उत्तर दिले. फडणवीस म्हणाले की, “शंभर टक्के महायुती मुंबई महानगर पालिकेची निवडणूक लढवेल, भाजपा वेगळी लढणार नाही आणि मुंबईमध्ये महायुतीचा महापौर होणार.”
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कसलेही मतभेद नाहीत, माध्यमांना बातमी मिळत नाही तेव्हा अशी बातम्या तयार केल्या जातात. आम्ही तिघेही (अजित पवार, एकनाथ शिंदे) एकत्र मिळून राज्य चालवत आहोत आणि चांगले काम कत आहोत. असं बोललं जातं की देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या कामावर स्टे आणला.पण मी सभागृहात देखील सांगितलं की स्टे आणायला मी उद्धव ठाकरे नाही. मी काम करणारा व्यक्ती आहे. आमच्यात कसलीच आडचण नाही, सगळं व्यवस्थित सुरू आहे. (स्त्रोत –लोकमत)