कोल्हापुरात राजस्थानहून अफू आणून विक्री; एकास अटक

0
13

माणदेश एक्सप्रेस न्युज|कोल्हापूर – राजस्थानहून अफू आणून कोल्हापुरात विक्री करणाऱ्या तरुणाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अंबप फाटा (ता. हातकणंगले) येथे छापा टाकून अटक केली. रवींद्र गोधनराम बेनिवाल (वय २०, मूळ रा. उदवनगर, जि. जोधपूर, राजस्थान, सध्या रा. अंबप फाटा) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून १२ किलो अफू, मोबाइल व अन्य साहित्य असा सुमारे १ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 

 

या संदर्भात अधिक माहिती अशी की, जिल्ह्यात सध्या अमली पदार्थांविरोधात विशेष मोहिम सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत अंमलदार प्रवीण पाटील यांना मिळालेल्या माहितीनुसार अंबप फाटा येथे एक परप्रांतीय तरुण अफूची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने छापा टाकून रवींद्र बेनिवालला अटक केली.

 

 

बेनिवाल याच्या खोलीत झडती घेतली असता त्याच्याकडे १२ किलो अफू सापडला. चौकशीदरम्यान, त्याने हा अफू राजस्थानातून ट्रकचालकांमार्फत कोल्हापुरात आणल्याची कबुली दिली. तसेच अफूच्या बोंडांची भुकटी करून तो विक्री करत असल्याचेही त्याने सांगितले. आरोपी ट्रकचालकांना अफू विकत होता आणि पुणे-बंगळुरू महामार्गावर किणी टोल नाका ते कोल्हापूर दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी थांबून विक्री करत होता.

 

 

या प्रकरणी पेठ वडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. आरोपीला पेठ वडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, अंमलदार प्रवीण पाटील, अरविंद पाटील, अशोक पोवार, कृष्णात पिंगळे, सुरेश पाटील, सोमराज पाटील, अनिल जाधव यांच्या पथकाने केली.
गेल्यावर्षीही वाठार परिसरात अशाच प्रकारे अफू विकणाऱ्या राजस्थानी आरोपीस अटक करण्यात आली होती. वर्षभरात अशा प्रकारचा हा दुसरा प्रकार समोर आल्याने राजस्थानहून कोल्हापूरमध्ये अमली पदार्थांची साखळी तयार होत असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

 

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here