
माणदेश एक्स्प्रेस न्यूज | गेवराई :
मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या सततच्या अतिवृष्टीने शेतकरी अक्षरशः उध्वस्त झाला आहे. बळीराजाच्या घरातले हसू पावसाच्या पाण्यात वाहून गेले, उरलं ते केवळ दुःख, आक्रोश आणि उद्ध्वस्त संसाराचे तुकडे. “कापसाच्या झाल्या वाती, सोयाबीनची झाली माती” अशा स्वरांतून शेतकरी व तरुणाई आपल्या वेदना रस्त्यावर उतरून व्यक्त करत आहेत.
सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांची उभी पिकं वाहून गेली, जनावरे उपाशी पडली, कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा गाडा थांबला. घराघरात चिंतेचे ढग दाटले आहेत. दिवाळीच्या ऐन सणासुदीला शेतकऱ्यांच्या घरात मात्र अंधार आहे. “पोटच्या पोरासारखी जपलेली जनावरे डोळ्यादेखत वाहून जाताना पाहणं म्हणजे हृदय पिळवटून टाकणारा अनुभव” असं हळहळून शेतकरी सांगतात.
शेतकऱ्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत असतानाही सरकार मात्र अद्याप ठोस निर्णय घेताना दिसत नाही. ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी वारंवार होत असूनही राज्य सरकारने अद्याप याकडे दुर्लक्षच केल्याने रोष वाढला आहे.
“शेतकऱ्यांची शेतं वाहून गेली, पण सरकार मात्र खुर्च्यांच्या खेळात रमली”, “सत्ता आली तर नेते आमचे, पण संकटात बळीराजा एकटा” अशा संतप्त घोषणांनी ग्रामीण भाग दणाणून गेला आहे.
फक्त शेतकरीच नाही, तरुणाईही आता या लढ्यात पुढे येत आहे. “खूप उचलले पक्षांचे जोडे, पोरांनो आपल्या बापासाठी लढूया थोडे”, “पुरे झालं जातीसाठी, आत्ता लढूया मातीसाठी” अशा घोषणांनी गावोगावी आंदोलने पेट घेत आहेत. लग्नसराई, संसार आणि भविष्यातील स्वप्न या साऱ्यांवर पावसाच्या थैमानाने घाला घातला आहे. “दिवाळीनंतर ठरलं होतं ताईचं लग्न, पण नशिबी आलं अतिवृष्टीचं विघ्न” अशी वेदनादायी हकीकत गावोगावी ऐकायला मिळते.
शेतकऱ्यांचा आक्रोश आता मागण्यांच्या स्वरूपात उभा ठाकला आहे.
ओला दुष्काळ तात्काळ जाहीर करावा
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी
पीकविमा आणि शासकीय अनुदान तातडीने वितरित करावे
जनावरांच्या चाऱ्याची तात्काळ सोय करावी
“शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा, तरच बळीराजा सुरक्षित राहील”, “तुझ्या बापाचा विमा कोणी खाल्ला? तुझ्या भाऊ-ताईला प्रश्न विचारायला शिक” अशा आक्रमक घोषणांनी आंदोलने तापत आहेत.
ग्रामीण जनतेचा राग थेट सत्ताधाऱ्यांवर केंद्रित झाला आहे. “अजित दादा अतिवृष्टीवर बोला, सरकारी तिजोरीचं कुलूप खोला” अशी मागणी ठिकठिकाणी जोर धरते आहे. ओला दुष्काळ न जाहीर करणे म्हणजे शेतकऱ्यांचा अपमान असल्याचं वक्तव्य शेतकरी संघटनांकडून करण्यात आलं आहे.
मराठवाड्यातील शेतकरी आज अस्तित्वाच्या कडेलोटावर उभा आहे. त्याच्या घरातला आनंद पावसात वाहून गेला आहे आणि उरली आहे ती फक्त झगडण्याची वेळ. बळीराजाच्या या वेदना पाहून “मायबाप सरकार जागे व्हा… आमचं मरण आलंय” हा हतबल आक्रोश प्रत्येकाच्या हृदयाला चटका लावणारा आहे.