
माणदेश एक्सप्रेस न्यूज| मुंबई :-
ओबीसी आरक्षणावरून पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. नुकत्याच केलेल्या वक्तव्यात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर आणि सत्ताधारी-विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. “ओबीसी बांधवांनो, तुमचं आरक्षण घेऊन हे टगे आता निवडणुकीला उभे राहणार आहेत,” असा आरोप करत हाके यांनी जरांगे यांना “लबाड कोल्हा” असे संबोधले.
ओबीसींना सजगतेचा इशारा
लक्ष्मण हाके म्हणाले, “ओबीसींच्या हक्कावर डल्ला घालणाऱ्यांविरुद्ध आता सजग व्हा. कुणबी सर्टिफिकेट घेऊन ओबीसीमध्ये प्रवेश करणारे हे टगे आहेत. आम्ही संघर्ष यात्रा काढत आहोत. जरांगे किती माणसं गोळा करतात ते त्यांनी करावं, पण ओबीसी जनता शांत बसून बघत नाहीये. ओबीसी तरुणांपासून सर्वांनाच हे स्पष्टपणे समजत आहे.”
पवार आणि सत्ताधाऱ्यांवरही निशाणा
हाके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावरही थेट आरोप केला. “डुप्लिकेट मंडल यात्रा काढण्याच्या भानगडीत पवारांनी पडू नये. नागपूरमध्ये ही यात्रा काढून पवारांनी त्यांच्या काळ्या कृत्याची उपरती केली आहे. सत्ताधाऱ्यांनीही ओबीसींच्या मंचावर जाऊन मोठमोठ्या गप्पा मारण्याऐवजी प्रत्यक्ष प्रश्न सोडवावेत. नाहीतर निवडणुकीत आम्ही त्यांना त्यांच्या जागेवर बसवू,” असा इशारा त्यांनी दिला.
आरक्षण संपल्याचा दावा
“गावागावात सगळ्यांनीच आता ओबीसीचे दाखले काढले आहेत, त्यामुळे ओबीसीचं आरक्षण संपलं आहे. फुले, शाहू, आंबेडकर यांनी सामाजिक न्यायासाठी दिलेलं हे आरक्षण संपवण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक दोघेही डाव आखत आहेत,” असा गंभीर आरोप हाके यांनी केला.
संघर्ष यात्रेतून हल्लाबोल
ओबीसींच्या हक्कांसाठी हाके यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर संघर्ष यात्रा सुरू असून, या यात्रेतून सत्ताधारी व विरोधक दोघांवरही हल्लाबोल केला जात आहे. “ओबीसी शांत आहे असं समजू नका; योग्य वेळी आम्ही सडेतोड उत्तर देऊ,” असा इशारा हाके यांनी शेवटी दिला.