
माणदेश एक्सप्रेस न्युज | जालना :
जालन्यात ओबीसी आंदोलनाचे नेते नवनाथ वाघमारे यांच्या चारचाकी गाडीला (स्कॉर्पिओ) अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना रविवारी मध्यरात्री जालना शहरातील नीलम नगर भागात घडली. सीसीटीव्ही फुटेजमधून एका अज्ञात व्यक्तीने ज्वलनशील पदार्थ ओतून गाडीला आग लावल्याचे स्पष्ट झाले असून, या प्रकरणी कदीम जालना पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.
नवनाथ वाघमारे यांची गाडी त्यांच्या कॉलनीत उभी होती. रात्री उशिरा एका अज्ञात व्यक्तीने हातामध्ये कॅन घेऊन घटनास्थळी प्रवेश केला. त्याने गाडीवर टाकलेल्या कव्हरवर चारही बाजूंनी ज्वलनशील पदार्थ ओतले आणि काही क्षणातच गाडी पेटवून दिली. आग लागल्याने गाडीवरील कव्हर क्षणार्धात जळून खाक झाले. ही आग भडकण्याआधीच परिसरातील नागरिकांनी आरडाओरड करत गाडीवर पाणी टाकून आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मोठा अनर्थ टळला असला तरी गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली असून त्यामध्ये अज्ञात व्यक्ती स्पष्टपणे दिसत असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून देण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सुरु असून आरोपीचा शोध घेतला जात आहे.
या घटनेनंतर नवनाथ वाघमारे यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी आरोप केला की, “माझी गाडी जाळली हा जरांगे समर्थकांचा कट आहे. यापुढे जरांगे यांच्या गाड्या जाळल्या तर आश्चर्य वाटून घेऊ नका,” असे ते म्हणाले. तसेच या प्रकरणात मनोज जरांगे, शरद पवार, रोहित पवार, अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणीही वाघमारे यांनी केली आहे.
घटनेनंतर परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी गाडी पेटल्याचे पाहताच गोंधळ उडाला. मात्र पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे परिस्थिती नियंत्रणात आली आहे.
या प्रकारामुळे ओबीसी आरक्षणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नव्या वादळाला तोंड फुटले आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला असून, या प्रकरणाच्या तपासामुळे पुढील राजकीय घडामोडींना नवे वळण मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.