
माणदेश एक्सप्रेस न्यूज | लातूर :
मराठा समाजासाठी सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करून ओबीसींचे आरक्षण संपविले असल्याचा आरोप करत, रेणापूर तालुक्यातील वांगदरी गावातील भरत महादेव कराड (वय ३५) या तरुणाने बुधवारी संध्याकाळी मांजरा नदीत उडी मारून आत्महत्या केली. त्यांच्या या टोकाच्या निर्णयामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, गाव व ओबीसी समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
भरत कराड यांनी आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यामध्ये त्यांनी ओबीसी आरक्षणाबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. “सरकारने मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू करून ओबीसींचे आरक्षण संपविले आहे. मी वेळोवेळी आरक्षण बचाव आंदोलनात सहभागी झालो. मात्र, ओबीसींविरोधी जीआर काढल्याने मी माझे जीवन संपवत आहे. माझ्या पश्चात माझ्या कुटुंबाला आणि ओबीसी समाजाला न्याय मिळावा,” असे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे.
बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास भरत कराड मांजरा नदीवरील पुलावर गेले. तेथून त्यांनी “ओबीसी आरक्षण संपले” अशी घोषणा दिली आणि थेट नदीत उडी घेतली. यावेळी जवळ उभे असलेले अविनाश गंभीरे आणि अंतराम मुंडे या दोघांना भरतने “मी शहीद होणार आहे” असे सांगितले होते. त्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष नदीत उडी घेतली. काही तरुणांनी जीव वाचवण्याचा प्रयत्न केला, पण त्यात अपयश आले.
भरत कराड यांच्या पार्थिवावर गुरुवारी दुपारी दोन वाजता वांगदरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी तहसीलदार प्रशांत थोरात, उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र चौधर, पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. मात्र, नागरिकांचा रोष उसळला होता. गाव व परिसरातील लोकांनी “ओबीसींना आरक्षण मिळालेच पाहिजे”, “भरत कराड यांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही” अशा घोषणा दिल्या.
भरत कराड हे व्यवसायाने ऑटोचालक होते. त्यांच्या कुटुंबाकडे फक्त दोन गुंठे जमीन आहे. तरीही ते गेली काही वर्षे ओबीसी आरक्षणासाठी होत असलेल्या प्रत्येक आंदोलनात सक्रिय सहभागी होत होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन मुली आणि एक मुलगा असा मोठा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
गावकऱ्यांनी भरत कराड यांच्या मृत्यूनंतर शासनाने त्यांच्या कुटुंबाला तातडीने मदत द्यावी, कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी द्यावी आणि ओबीसी आरक्षणाबाबत योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे.