ओबीसींचे आरक्षण संपले? तायवाडेंचा जोरदार टोला; राजकारण्यांच्या पोळीवर ‘मिरची’

0
121

माणदेश एक्स्प्रेस न्यूज | नागपूर :

मराठा आरक्षणावरील शासन निर्णयामुळे ओबीसींचे आरक्षण संपुष्टात येणार असल्याचा दावा काही नेत्यांकडून सातत्याने केला जात आहे. मात्र, ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी यावर भाष्य करताच राजकीय वर्तुळात हलकल्लोळ माजला आहे. “ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का बसलेला नाही, पण राजकीय पोळी भाजणाऱ्यांनी चुकीचे संदेश देऊन समाजात भीती निर्माण केली आहे,” असा घणाघात करत तायवाडेंनी नेत्यांना जाहीर आव्हान दिले.


मराठा, ओबीसी, बंजारा, धनगर आणि आदिवासी आरक्षणाचा प्रश्न राज्यात तापलेला आहे. विशेषतः २ सप्टेंबरच्या शासन निर्णयानंतर ओबीसींच्या आरक्षणावर गदा येईल, अशा अफवा पसरवल्या जात आहेत. नागपूर हे या आंदोलनाचे केंद्रबिंदू ठरत असून, तायवाडेंच्या वक्तव्यामुळे वातावरण अधिकच तापले आहे.


भरत कराड या तरुणाने भीतीपोटी आत्महत्या केल्याचा उल्लेख करत तायवाडेंनी आंदोलनाच्या नावाखाली भीतीचे राजकारण करणाऱ्यांना टोला लगावला.

“ओबीसींचे आरक्षण संपले म्हणून तरुण आत्महत्या करत आहेत, ही अत्यंत वेदनादायक बाब आहे. नेत्यांनी समाजाचे मनोधैर्य वाढवायला हवे, नुसती भीती पसरवू नये. आम्ही संविधानिक आरक्षण टिकवू शकतो, याची खात्री जनतेला द्यायला हवी,” – बबनराव तायवाडे


तायवाडेंनी आत्महत्या केलेल्या मराठा समाजातील कुटुंबांना सरकारकडून मदत आणि नोकरीचे आश्वासन दिले जाते, त्याचप्रमाणे ओबीसी समाजातील आत्महत्याग्रस्त कुटुंबांनाही मदत मिळावी, अशी मागणी केली. “तरुणांनी टोकाची पावले उचलू नयेत, हिमतीने पुढे यावे,” असे आवाहनही त्यांनी केले.


तायवाडेंनी ठामपणे सांगितले की, २ सप्टेंबरच्या शासन निर्णयाने ओबीसी आरक्षणाला धक्का बसलेला नाही. मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळण्याचा दावा करणारा गट चुकीची माहिती पसरवत आहे. “राजकारणासाठी भीती निर्माण केली जात आहे. लोकांचा विश्वास नेत्यांवर असतो, पण तो विश्वास डळमळीत करणारे राजकारण योग्य नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.


मंत्री छगन भुजबळ यांच्या नागपूर मेळाव्यावर प्रतिक्रिया देताना तायवाडेंनी म्हटले,

“६० टक्के समाज असल्याने अनेक नेते पुढे येऊ शकतात. मेळावे व्हावेत, स्वागत करतो. पण त्यातून मनोधैर्य वाढवणारे वातावरण तयार व्हायला हवे. दिशाभूल करणारे वातावरण नव्हे.”


तायवाडेंनी पुढे सांगितले की, “ज्यांना अन्याय वाटतो त्यांनी कोर्ट, मोर्चा, सभा असा कोणताही मार्ग स्वीकारावा. पण समाजाचे मनोधैर्य वाढवणे हेच लक्ष्य असावे.”
ते पुढे म्हणाले, “मी आंदोलन केल्यामुळे सरकारने ५८ शासन निर्णय काढले. त्यामुळे आमची भूमिका नेहमीच सकारात्मक राहिली आहे. राजकारणी लोकांना राजकारण हवे असते, पण मी समाजसेवक आहे.”


मुंबईत घेतलेल्या बैठकीत ओबीसींच्या १४ मागण्यांपैकी १२ मागण्या मान्य झाल्याचे तायवाडेंनी सांगितले. उर्वरित दोन मागण्यांवर मुख्यमंत्री स्तरावर निर्णय अपेक्षित आहे. आजच्या उपसमितीत या मुद्यांवर सविस्तर चर्चा होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.


ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून राजकीय वातावरण तापलेले असतानाच बबनराव तायवाडेंच्या वक्तव्याने नवे समीकरण निर्माण केले आहे. “आरक्षणाला धक्का नाही” असा दावा करत त्यांनी भीतीचे राजकारण करणाऱ्यांना धारेवर धरले आहे. आता नेत्यांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी करून त्यांनी आरक्षणाचा वाद आणखी चिघळवला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here