
माणदेश एक्सप्रेस/मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक स्थळे आणि राज्यातील इतर सांस्कृतिक स्थळे पाहता यावीत याकरता केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने नवी योजना आणली आहे. त्यानुसार, छत्रपती शिवाजी महाराज सर्किट ट्रेन सुरू करण्यात येणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात आज माहिती दिली. केंद्रीय रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव आज मुंबई दौऱ्यावर असताना महाराष्ट्रातील विविध रेल्वे प्रकल्पांची त्यांनी माहिती दिली. त्यावेळीच छत्रपती शिवाजी महाराज सर्किट ट्रेनबाबत फडणवीसांनी सांगितलं.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज सर्किट ट्रेन सुरू होणार आहे. ज्यामध्ये सुंदर अशा प्रकारची आयकॉनिक रेल्वे सुरू होईल. यामार्फत दहा दिवसांची टूर केली जाईल. छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले, जागा, त्यांच्याशी संबंधित इतर सांस्कृतिक स्थळांना ही रेल्वे जोडणार आहे.”
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “गोंदिया – बल्लारशा रेल्वे मार्गाच्या दुहेकरीकरणाकरता ४ हजार ८१९ कोटी रुपये केंद्र सरकारने दिले आहेत. यामुळे निश्चितपणे विदर्भाला मोठा फायदा होणार आहे. छत्तीसगड आणि तेलंगणासाठी व्यापार, व्यवहार वाढण्याच्या दृष्टीने ही महत्त्वाची रेल्वे लाईन आहे. गोंदियातून मध्य प्रदेश आणि छत्तीसगडची सीमा आहे. त्यामुळे स्ट्रॅटेजिक लाईन मंजूर झाल्याने मी मंत्री आश्विनी वैष्णव यांचे आभार मानतो.”
“१ लाख ७३ हजार कोटी रुपये केंद्र सरकार रेल्वे इन्फ्रावर खर्च करत आहे. महाराष्ट्रातील १३२ रेल्वे स्टेशन्सच्या पुनर्विकासाचे काम हाती घेतले आहे. महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या स्थानकांचं वर्ड क्लास ट्रान्स्फर्मेशन होतंय. यावर्षी २३ हजार ७०० कोटी रुपये रेल्वे बजेटमध्ये मिळाले आहेत. युपीएच्या दहा वर्षांत दहा हजार कोटी रुपये एकत्रितपणे मिळाले नाहीत. पण, आता दरवर्षी २३ हजार-२५ हजार कोटी मिळाले आहेत”, अशीही माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.