
माणदेश एक्सप्रेस न्यूज | नवी दिल्ली :
राजधानी दिल्लीमध्ये बुधवारी दुपारी झालेल्या भीषण अपघाताने पुन्हा एकदा जुन्या व अनधिकृत इमारतींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. दर्यागंज परिसरातील सद्भावना पार्कजवळील तीन मजली इमारत दुपारी १२.१४ वाजताच्या सुमारास कोसळली. या घटनेत आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला असून अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मृतदेह रुग्णालयात हलवले
अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिस व आपत्कालीन यंत्रणांना माहिती दिली. काही वेळातच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि बचावकार्य सुरू झाले. आतापर्यंत तीन मृतदेह बाहेर काढण्यात आले असून त्यांना लोकनायक रुग्णालयात हलवण्यात आले आहे. दरम्यान, तीन जणांना वाचवण्यात यश आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ढिगाऱ्याखाली अजून किती लोक अडकले आहेत याची निश्चित माहिती अद्याप मिळालेली नाही.
अधिकाऱ्यांची माहिती व पोलिसांचा इशारा
या दुर्घटनेनंतर डीडीएमएसह नागरी प्रशासनाला माहिती देण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी हजेरी लावून परिस्थितीचा आढावा घेतला. “या प्रकरणातील जबाबदार व्यक्तींविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल,” असे आश्वासन दिल्ली पोलिसांनी दिले आहे.
गेल्या महिन्यातही अशीच घटना
१२ जुलै रोजी राजधानीतील वेलकम परिसरात चार मजली अनधिकृत निवासी इमारत कोसळली होती. त्या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला होता, तर आठ जण जखमी झाले होते. याशिवाय, शेजारच्या इमारतीचेही मोठे नुकसान झाले होते. या घटनेला महिना उलटत नाही तोच पुन्हा एकदा इमारत कोसळल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.
नागरिकांमध्ये भीती व संताप
सततच्या अशा घटनांमुळे दिल्लीतील जुन्या व धोकादायक इमारतींबाबत मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. प्रशासनाकडून नियमित तपासणी न झाल्याने जीवितहानी होत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. दर्यागंजमधील दुर्घटनेने पुन्हा एकदा सुरक्षा उपाययोजनांचा गंभीर प्रश्न समोर आला आहे.
👉 सध्या घटनास्थळी पोलीस, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाचे जवान बचावकार्य करत आहेत. ढिगाऱ्याखालून अजून किती जणांना बाहेर काढता येते याकडे संपूर्ण दिल्लीचे लक्ष लागले आहे.