
माणदेश एक्सप्रेस न्यूज|छत्रपती संभाजीनगर – हलाखीची परिस्थिती, भिक्षा मागून जीवन निर्वाह… पण त्याही परिस्थितीत आपल्या पत्नीवरच्या प्रेमापोटी एक दागिना देण्याची इच्छा जपणाऱ्या ९३ वर्षीय आजोबांनी आपल्या आजीसाठी ‘सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत’ घेऊन दिली. या वृद्ध दाम्पत्याची भावनांनी ओथंबलेली ही गोष्ट सध्या सोशल मीडियावर लाखो हृदयं पिळवटून टाकत आहे.
मूळचे जालना जिल्ह्यातील अंभोरा जहागीर (ता. मंठा) येथील निवृत्ती सखाराम शिंदे आणि त्यांच्या पत्नी शांताबाई शिंदे हे सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये राहतात. नुकताच ते दोघं एका सराफाच्या दुकानात गेले. अनेकांनी पहिल्यांदा त्यांना मदतीसाठी आले आहेत असं समजलं. पण त्यांनी जे सांगितलं, त्याने उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी आलं – “पत्नीला कधीच काही दागिना देऊ शकलो नाही, आज तिची इच्छा पूर्ण करायची आहे.”
आजोबांनी आपल्या पत्नीसाठी एक पोत घ्यायचं ठरवलं. त्यांनी वर्षानुवर्षे १-१ रुपया साठवून १,१२० रुपये गोळा केले होते. या रकमेतील चिल्लर त्यांनी अगदी आदराने दुकानदारासमोर ठेवली. हे पाहून दुकानदार नीलेश खिंवसरा यांनी त्यांचं प्रेम आणि समर्पण ओळखून, त्या पोताला प्रेमाची किंमत लावली. त्यांनी ती पोत आजोबांना सप्रेम भेट दिली आणि केवळ ‘आशीर्वाद’ म्हणून २० रुपये घेतले.
ही हृदयस्पर्शी घटना कॅमेऱ्यात कैद झाली आणि समाजमाध्यमांवर व्हायरल झाली. अवघ्या काही तासांत व्हिडीओला २२.६ मिलियन व्ह्यूज मिळाले. शिंदे दाम्पत्य सध्या आषाढी एकादशीसाठी पंढरपूर वारीसाठी रवाना झाले असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.
दोन मुलांपैकी एकाचा मृत्यू झाला असून दुसरा व्यसनाधीन असल्यामुळे या वृद्ध दाम्पत्याला कुणाचा आधार नाही. तरीही आजोबांनी आपल्या पत्नीवरच्या प्रेमासाठी जो त्याग केला, तो अनेकांच्या डोळ्यांत अश्रू आणणारा ठरला.
“ही पोत सोन्याची नव्हे, तर एका पतीच्या निस्सीम प्रेमाची आहे,” अशा शब्दांत सराफ व्यावसायिक खिंवसरा यांनी ही घटना ‘लोकमत’शी बोलताना वर्णन केली.