
माणदेश एक्सप्रेस न्यूज :-
देशभरात रस्त्यांवर, चौकात, मंदिरे आणि मशिदींच्या परिसरात आपल्याला भिकारी सहज दिसतात. पण या भिकाऱ्यांचं खरं वास्तव काय आहे, याची माहिती अनेकदा लोकांना नसते. काहींच्या मागे गरिबी, आजारपण किंवा आधार नसलेली कुटुंबव्यवस्था असते, पण काहीजण मात्र भीक मागणं हा कमाईचा सोपा मार्ग मानतात. छत्तीसगडच्या राजधानी रायपूरमध्ये याचं ज्वलंत उदाहरण समोर आलं आहे. समाज कल्याण विभागाने भिकाऱ्यांच्या पुनर्वसन मोहिमेदरम्यान अशी महिला पकडली जी लखपती भिकारी निघाली.
या महिलेचं नाव बेनवती जंघेल आहे. ही महिला मंदिरं आणि मशिदींमध्ये भीक मागताना वारंवार दिसत होती. विभागाने चौकशी केली असता धक्कादायक सत्य बाहेर आलं. महिलेच्या खात्यात तब्बल 60 हजार रुपये जमा आहेत. याशिवाय तिने स्वतःचं घर भाड्याने दिलं असून दरमहा तिला 8 हजार रुपयांचं स्थिर उत्पन्न मिळतं.
बेनवतीच्या दोन मुलांची आर्थिक स्थिती खूपच चांगली आहे.
एक मुलगा विदेशात मोठ्या कंपनीत चांगल्या पगाराच्या नोकरीवर आहे.
दुसरा मुलगा किराणा दुकानाचा व्यवसाय करून मोठा उद्योजक म्हणून स्थिर जीवन जगतो.
दोन्ही मुलांचे स्थिर उत्पन्न आणि आपलं भाड्याचं उत्पन्न असूनही ही महिला रस्त्यावर भीक मागताना दिसते.
समाज कल्याण विभागाने जेव्हा महिलेची विचारपूस केली तेव्हा ती म्हणाली,
“मी भीक मागत नाही, मला आजार आहे… मी फक्त फिरते.”
मात्र प्रत्यक्षात लोकांनी तिला हात पुढे करून पैसे मागताना पाहिलं आहे.
समाज कल्याण विभागाने महिलेचा रेस्क्यू करून तिला पुनर्वसन केंद्रात नेलं आहे.
केंद्राच्या व्यवस्थापक ममता शर्मा यांनी सांगितलं की, सध्या या महिलेचं काउंसलिंग सुरू आहे.
लवकरच महिलेच्या वागण्यामागील खरी कारणं समोर येतील.
या घटनेनंतर मोठा प्रश्न उभा राहतो की –
जेव्हा मुलं संपन्न आहेत, खाते आणि घरातून उत्पन्न आहे, तरीही महिला भीक का मागते?
देशभरात अशा किती भिकारी आहेत जे प्रत्यक्षात संपन्न असूनही भीक मागून लोकांची फसवणूक करत आहेत?
ही घटना समाजासमोर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करते आणि भीक मागणं हा केवळ गरिबांचा प्रश्न नसून काही ठिकाणी तो सवयीचा किंवा व्यावसायिक प्रकार झाला आहे, याचं स्पष्ट उदाहरण आहे.