![पियुष भंडलकर](https://mandeshexpress.com/wp-content/uploads/2025/01/पियुष-भंडलकर.png)
माणदेश एक्सप्रेस/बारामती : बारामती तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तालुक्यातील होळ येथील नऊ वर्षी मुलाची बापानेच हत्या केल्याचे समोर आले आहे, बारामती तालुक्यातील होळ येथील पियुष विजय भंडलकर या नऊ वर्षीय बालकाचा त्याच्याच वडिलांनी अभ्यास करत नाही म्हणून रागाच्या भरात मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाला.
मुलगा अभ्यास करत नाही यामुळे वडीलांनी मुलाला रागाच्या भरात भिंतीवर डोकं आपटून आणि गळा दाबून त्याचा खून केला. १४ जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजता राहत्या घरी ही घटना घडली आहे. त्यानंतर हा सर्व प्रकार लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र वडगाव निंबाळकर पोलिसांनी या खुनाचं रहस्य उलघडत वडील विजय गणेश भंडलकर, मयत पियुषची आजी शालन गणेश भंडलकर आणि संतोष सोमनाथ भंडलकर या तिघांवर वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वडील विजय भंडलकर यांनी मुलगा पियुष याला तू अभ्यास करत नाही, सारखा बाहेर खेळत असतो, तू तुझ्या आईच्या वळणावर जावून माझी इज्जत घालवणार दिसतोयस, असे म्हणत त्याला हाताने मारहाण केली. राग अनावर झाला अन् त्यांनी त्याचा गळा दाबून त्याला भिंतीवर आपटले. यात त्याचा मृत्य झाला.