
माणदेश एक्सप्रेस न्यूज | जामखेड :
निलेश घायवळ प्रकरणावरून राज्यात चांगलाच राजकीय वाद रंगला असून, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी भाजप आमदार राम शिंदे यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांना आता शिंदे यांनी थेट आणि जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. शिंदे यांनी उलटपक्षी रोहित पवारांवरच खोटे आरोप आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना मदत केल्याचे गंभीर आरोप केले आहेत.
राम शिंदे म्हणाले,
“मला वाटतं आमदार रोहित पवारांनी जे आरोप केले आहेत ते बिनबुडाचे, आधारहीन आणि खोटे आहेत. त्यांनी निलेश घायवळला पासपोर्ट मिळवून दिल्याचा आरोप माझ्यावर केला. मात्र प्रत्यक्षात निलेश घायवळला पासपोर्ट 2020 साली मिळाला आणि तो मिळवून देण्यासाठी रोहित पवारांनीच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या माध्यमातून प्रयत्न केले, असं त्याच्याच नातेवाईकांनी सांगितलं आहे.”
शिंदे यांनी पुढे म्हटलं की,
“माझ्यावर आरोप करून ते स्वतःचं लक्ष दुसरीकडे वळवू पाहत आहेत. ‘जग वेडं आणि मी शहाणा’ असा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. पण हे लोक आता तोंडघाशी पडले आहेत.”
सचिन घायवळला शस्त्र परवाना देण्याबाबत विचारल्यावर राम शिंदे म्हणाले,
“हा विषय गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या अधिकारक्षेत्रात येतो. त्यांनी चौकशी सुरू केली आहे. त्यांनी कोणाला परवाना द्यायचा की नाही, हा पूर्ण अधिकार त्यांचा आहे. मी किंवा आमच्या पक्षातील कोणीही यात हस्तक्षेप केलेला नाही. रोहित पवारांचे आरोप पूर्णपणे बिनबुडाचे आणि राजकीय हेतूने प्रेरित आहेत.”
या प्रकरणाच्या मुळाशी काय आहे, यावर शिंदे म्हणाले,
“मी मंत्री होतो तेव्हा मला पाडण्यासाठी प्रयत्न झाले. त्या काळात रोहित पवार निलेश घायवळला जामखेडला घेऊन आले होते. त्यांचे कौटुंबिक संबंध असल्याचं त्या वेळी सर्वांना ठाऊक होतं. त्यांच्या बैठका झाल्या, फोटोही आले. नंतर त्यांच्या मध्ये काही देण्या-घेण्यावरून की रिअल इस्टेटवरून मतभेद झाले असावेत. पण आता तेच लोक एकमेकांवर आरोप करत आहेत.”
राम शिंदे यांनी आणखी गंभीर आरोप करताना सांगितलं,
“त्या काळात आमच्या पंचायत समितीच्या सदस्यांना हाणूनमारून पळवण्यात आलं. सभापतीपद मिळवण्यासाठी दबाव आणि धमक्या देण्यात आल्या. हे सर्व रोहित पवारांच्या सांगण्यावरून झालं. त्यांच्या या गुन्हेगारी शैलीची साक्ष संपूर्ण तालुका देऊ शकतो.”
निलेश घायवळशी असलेले संबंध आणि त्याच्यावरील गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबत विचारले असता शिंदे म्हणाले,
“माझा निलेश घायवळशी काहीही संबंध नाही. उलट जेव्हा मी गृहराज्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस गृहमंत्री होते, तेव्हा त्याच्यावर मोक्का लावण्यात आला होता. पण त्या प्रकरणातून त्याला सोडवण्यासाठी रोहित पवारांनीच प्रयत्न केले. मग आज ते इतरांवर आरोप का करत आहेत?”
राम शिंदे यांनी स्पष्ट केलं की,
“रोहित पवार सतत खोटारडे आरोप करून स्वतःची प्रतिमा वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना स्वतःच्या नात्याचं, संबंधाचं उत्तर द्यावं लागेल. मी कोणत्याही गुन्हेगाराला मदत केली नाही. सत्य लवकरच समोर येईल.”
निलेश घायवळ प्रकरणाने सध्या अहमदनगर, बीड आणि सोलापूर जिल्ह्यांच्या राजकारणात खळबळ उडवली आहे. घायवळच्या कथित गुन्हेगारी कारवायांवरून आणि त्याला मिळालेल्या पासपोर्ट व शस्त्र परवान्यावरून आरोप-प्रत्यारोपांचा भडिमार सुरू आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांमध्ये राजकीय तापमान वाढलं आहे.
एकूणात, निलेश घायवळ प्रकरणाने केवळ स्थानिकच नाही तर राज्याच्या पातळीवरही भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार गटातील संघर्ष अधिक तीव्र केला आहे.
राजकीय नेत्यांच्या या आरोप-प्रत्यारोपांमुळे पुढील काही दिवस महाराष्ट्रातील राजकारण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत.