फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात नवीन वळण; प्रशांत बनकरच्या बहिणीचा धक्कादायक गौप्यस्फोट 

0
668

माणदेश एक्सप्रेस न्यूज | फलटण :

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी (Phaltan Doctor Suicide Case) दिवसेंदिवस नवे खुलासे होत आहेत. आत्महत्येपूर्वी या डॉक्टरने आपल्या हातावर सुसाईड नोट लिहून ठेवली होती, ज्यामध्ये तिने पोलीस अधिकारी पीएसआय गोपाल बदने याच्यावर बलात्काराचा आणि प्रशांत बनकर नावाच्या तरुणावर मानसिक व शारीरिक छळाचा आरोप केला होता. या घटनेने संपूर्ण राज्य हादरले असतानाच आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. कारण, आरोपी प्रशांत बनकरच्या बहिणीने केलेल्या धक्कादायक खुलाशामुळे चर्चांना ऊत आला आहे.


प्रशांत बनकरच्या बहिणीने स्पष्टपणे सांगितले की, मृत महिला डॉक्टर आणि त्यांचे कुटुंब या दोघांमध्ये अतिशय जवळचे संबंध होते. डॉक्टर त्यांच्या घरी ये-जा करीत होत्या आणि काही वेळा त्यांच्या घरीही राहायच्या. त्या घरच्यांसारख्या वागत होत्या. “मी घरी आले की डॉक्टर मला भेटायच्या. आम्ही दोघी चांगल्या मैत्रिणी झालो होतो. ती तिचं सगळं माझ्याशी शेअर करायची,” असे प्रशांतच्या बहिणीने सांगितले.

ती पुढे म्हणाली, “या महिन्यात माझा भाऊ आठ दिवसांसाठी घरी आला होता. तो तिच्याशी घरच्यांसारखा वागत होता. पुण्याला परतल्यावर त्या डॉक्टरनेच त्याला मेसेजवर प्रपोज केलं. पण माझ्या भावाने लगेचच नाही म्हटलं. त्याने स्पष्ट सांगितलं की — ‘मॅडम, मी तुम्हाला घरच्यांसारखं मानतो. तुम्ही मला दादा म्हणता.’ त्यानंतर माझा भाऊ तिच्याशी संपर्कातही नव्हता.”


प्रशांत बनकरच्या बहिणीने पुढे म्हटले की, “जर माझ्या भावाने तिचा मानसिक छळ केला असता, तर ती लक्ष्मीपूजनाच्या वेळी का नाही बोलली? त्या वेळी ती आमच्या घरीच आली होती. आई-वडीलही उपस्थित होते. पण तिने कधी काही सांगितले नाही. आता माझ्या भावाने नकार दिल्यानंतरच त्याचं नाव घेतलं गेलं.”

या विधानामुळे प्रकरणाची दिशा पूर्णपणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत प्रशांत बनकरवर गंभीर आरोप होते, परंतु बहिणीच्या वक्तव्यानंतर पोलिस तपासाची दिशा नव्याने ठरू शकते.


घटनेनंतर पोलिसांनी प्रशांत बनकरच्या वडिलांना आणि भावाला शुक्रवारी पोलिस स्टेशनमध्येच थांबवून ठेवले होते. तथापि, प्रशांत बनकरला अटक करण्यात आलेली नसून तो स्वतःहून घरी आला आणि तेथूनच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले, अशी माहिती प्रशांतच्या भावाने दिली आहे.


या प्रकरणात पीएसआय गोपाल बदने हा अजूनही फरार आहे. महिला डॉक्टरने आपल्या आत्महत्येपूर्वी या अधिकाऱ्यावर बलात्काराचा गंभीर आरोप केला होता. दरम्यान, प्रशांत बनकरच्या बहिणीच्या या वक्तव्यामुळे पोलिसांसमोर आता दोन वेगवेगळे पैलू उघड झाले आहेत —
एकीकडे डॉक्टरने केलेले आरोप आणि दुसरीकडे बनकर कुटुंबाचा प्रतिवाद.

या दोन्ही बाजूंच्या विधानांची तुलना करून पोलिस सखोल चौकशी करत आहेत. तपास अधिकार्‍यांनी मृत डॉक्टरचा मोबाईल, मेसेजेस आणि सोशल मीडियावरील संवाद यांचादेखील तपास सुरू केला आहे.


फलटण शहरात या घटनेबाबत विविध चर्चा रंगल्या आहेत. एक सरकारी डॉक्टर, एक पोलीस अधिकारी आणि एक सामान्य युवक यांच्यातील नातेसंबंध आणि त्यातून निर्माण झालेला ताण हे या आत्महत्येचं मूळ कारण मानलं जात आहे. तथापि, सत्य बाहेर येण्यासाठी अजून वेळ लागणार असल्याचं पोलिस सूत्रांनी सांगितलं.


या आत्महत्येने केवळ फलटणच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. वैद्यकीय व्यवसायातील ताण, वैयक्तिक नात्यांमधील गुंतागुंत आणि अधिकाऱ्यांवरील आरोप — या सगळ्याचा ताळमेळ लावणे आता तपास यंत्रणेसाठी मोठे आव्हान ठरणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here