दिशा सालियन मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट; आदित्य ठाकरेंना क्लीन चीट

0
134

माणदेश एक्स्प्रेस न्यूज|मुंबई : सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात मोठा वळण आले असून, शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांना या प्रकरणात क्लीन चीट मिळाली आहे. दिशाची हत्या झाल्याचं किंवा तिच्यावर कोणत्याही प्रकारचा लैंगिक अत्याचार झाल्याचं कोणतंही वैद्यकीय किंवा वैज्ञानिक पुरावा मिळाला नसल्याची माहिती मुंबई पोलिसांनी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे सादर केली आहे.

 

दिशाच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेत आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप करण्यात आले होते. मात्र, मुंबई पोलिसांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात या सर्व आरोपांचे खंडन करण्यात आले असून, घटनेच्या दिवशी दिशासोबत असलेले तिचे प्रियकर आणि मित्र यांचे जबाब सत्य असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

 

पोस्टमॉर्टम आणि फॉरेन्सिक अहवालात लैंगिक अत्याचाराचे कोणतेही पुरावे नाहीत
पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांनी न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात सांगितलं की, २०२० चा क्लोजर रिपोर्ट हा वैज्ञानिक तपासणी व बोरिवली पोस्टमॉर्टम सेंटरच्या रिपोर्टवर आधारित होता. या रिपोर्टमध्ये लैंगिक अत्याचार किंवा शारीरिक जखमांची कोणतीही लक्षणं आढळली नाहीत. तसेच, सीसीटीव्ही फुटेज आणि कॉल रेकॉर्ड तपासणीमध्येही कोणताही संशयास्पद भाग आढळला नाही.

 

 

आदित्य ठाकरेंनी मागितला न्यायालयात हस्तक्षेप
दरम्यान, आदित्य ठाकरेंच्या वतीनेही हस्तक्षेप याचिका दाखल करत न्यायालयात बाजू मांडण्यात आली. यामध्ये सांगण्यात आलं की, “आपल्यावर राजकीय सूडबुद्धीने खोटे आरोप लावण्यात आले आहेत. आपण प्रतिवादी नसतानाही आपले नाव गोवलं गेलं आहे.” त्यामुळे याचिका फेटाळावी, अशी मागणी ठाकरेंच्या वकिलांनी केली.

 

याचिकाकर्त्यांच्या वकिलांचा दावा : तपास अपुरा
दिशाचे वडील सतीश सालियन यांच्या वतीने वकील नीलेश ओझा यांनी पोलिसांचा तपास अपुरा असल्याचा दावा केला आहे. यावर न्यायालयाने पुढील युक्तिवादासाठी २ आठवड्यांचा कालावधी दिला आहे.

 

 

दिशा सालियन कोण होती?
दिशा सालियन ही कर्नाटकातील उडुपी येथे जन्मलेली सेलिब्रिटी मॅनेजर होती. तिने सुशांत सिंह राजपूत, वरुण शर्मा, भारती सिंह यांच्यासह अनेक कलाकारांसोबत काम केलं होतं. ती अभिनेता रोहन रॉयला डेट करत होती आणि मृत्यूपूर्वी त्यांचा साखरपुडाही झाला होता.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here