सांगलीत नवं स्कॅम, नशेच्या गोळ्यांची मेडिकलमधून चोरी, वाढीव दराने विक्री, पोलिसांनी टोळीला शिकवला धडा

0
424

माणदेश एक्सप्रेस / सांगली : नशेच्या गोळ्यांची वाढीव दराने विक्री करण्यात येत होती. या प्रकरणी मेडिकल दुकानातील कामगारास पोलिसांनी सापळा रचून जेरबंद केले. इतकेच नाही तर तरुणांकडून मानवी शरीरावर अपायकारक करणाऱ्या १८ हजार रुपये किंमतीच्या ८९० नशेच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या.

 

 

जानेवारी महिन्यात महात्मा गांधी पोलीस ठाण्याने कारवाई करीत नशा करण्यासाठी वापरण्यात येणारे मेफेनटर्माइन नावाच्या इंजेक्शन आणि गोळ्यांचा बेकायदा साठा करणाऱ्या सांगलीतील एका केमिस्ट शॉपचालकासह त्याच्या दोन साथीदारांनाही अटक करण्यात आली होती. यावेळी तिघांकडून ६ लाख १६ हजार ६४१ रुपयांची तब्बल १५०७ इंजेक्शन हस्तगत करण्यात आली होती. यानंतर सांगलीमध्येच पुन्हा एकदा नशेच्या गोळ्या विक्री करणाऱ्याला ताब्यात घेतले आहे.

 

 

 

पालकमंत्र्यांनी कार्यभार स्विकारल्यावर या प्रकाराला आळा बसावा याकरिता नशामुक्त अभियान सुरु करण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कारवाईची मोहिम राबविण्यास सुरवात केली आहे. मिरज मार्केट परिसरात संशयित नशेच्या गोळ्या विक्रीकरिता आणणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला मिळाली होती. त्यानुसार परिसरात सापळा लावण्यात आला. काही वेळाने संशयित हातात पिशवी घेवून थांबला. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यास ताब्यात घेवून त्याची झडती घेतली.

 

पिशवीमध्ये ८९० नशेच्या गोळ्या आढळून आल्या. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याशिवाय नशेच्या गोळ्यांची विक्री करत असल्याचे पोलीस चौकशीत स्पष्ट झाले. जुनेद शब्बीर शेख याला अटक करण्यात आली आहे. पोलीस चौकशीत त्याने सदरचा औषध साठा तो कामास असलेल्या मिरजेतील वडगावकर हॉस्पिटलच्या मेडिकलमधून चोरुन आणल्याची कबुली दिली. नशा करणाऱ्या व्यक्तींना तो चोरुन आणलेली औषधे जादा दराने विक्री करणार असल्याचे पोलिसांना आढळून आले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here