माणदेश एक्सप्रेस न्युज : मुंबई : राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती व महाविकास आघाडी यांच्यात झालेल्या लढतीत महायुतीने महाविकास आघाडीचा सुफडासाफ झाला. महायुतीच्या नव्या सरकारचा शपथविधी येत्या ५ डिसेंबर रोजी होईल अशी माहिती आहे.
मुंबईतील आझाद मैदानावर ५ डिसेंबर रोजी नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. कोणती खाती कोणाकडे असावी? मंत्रिमंडळ कसं असावं? कोणाकडे कोणती खाती असणार याचीही चर्चा आता सुरू झाली आहे.
मुख्यमंत्र्यांसह किमान २० जणांचा शपथविधी होणार असल्याची शक्यता आहे. त्यापूर्वी दिल्लीतील बैठकीत खाते वाटपावरूनही खलबतं झालीत. भाजप एकनाथ शिंदे यांना गृहखातं देण्यास तयार नाही तर नगरविकास खातं देण्याची तयारी दाखवत केंद्रात शिवसेनेला मंत्रिपद देण्यासही तयार आहे.
अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपदासह अर्थखातं देण्यावर एकमत झाले आहे. यासह केंद्रात राष्ट्रवादीला कॅबिनेट मंत्रिपद मिळेल. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रीपदासह अर्थमंत्री पद, महिला आणि बालविकास, अल्प संख्याक, मदत आणि पुनर्वसन, वैद्यकीय शिक्षण, आदिवासी विकास, अन्न आणि नागरी पुरवठा अशी खाती अजित दादांना मिळण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला नगरविकास, सार्वजनिक बांधकाम, उद्योग, शिक्षण, सांस्कृतिक विभाग, पाणी पुरवठा, आरोग्य, परिवहन, राज्य उत्पादन शुल्क ही खाती दिली जाणार असल्याची शक्यता आहे. यासोबत भाजप गृह खातं, महसूल, ऊर्जा, ग्रामविकास, जलसंपदा, गृह निर्माण, वन खातं, ओबीसी मंत्रालय, पर्यटन, सामान्य प्रशासन ही महत्त्वाची खाती स्वतःकडे ठेवणार असल्याची माहिती आहे.