
काठमांडू :
नेपाळची राजधानी काठमांडू मंगळवारी (दि. ९) रणांगण बनली होती. सोशल मीडियावरील बंदीविरोधात Gen-Z आंदोलनकर्त्यांनी सरकारविरोधात उभारलेले आंदोलन हिंसक वळणावर पोहोचले. या संतप्त आंदोलनकर्त्यांच्या तावडीत माजी पंतप्रधान शेर बहादुर देउबा आणि त्यांची पत्नी, माजी परराष्ट्र मंत्री आरजू देउबा सापडले. जमावाने या दाम्पत्याला बेदम मारहाण केली. शरीरावर गंभीर जखमा झालेल्या अवस्थेत त्यांना नेपाळच्या सैन्याने वाचवले. जर वेळेवर सैनिक पोहोचले नसते तर या जोडप्याचा जीव वाचणे कठीण झाले असते, अशी धक्कादायक परिस्थिती निर्माण झाली होती.
साक्षीदारांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदोलनकर्त्यांनी देउबा यांच्या काठमांडू येथील घरावर हल्ला चढवला. घरातील सर्व सामानाची तोडफोड झाली. व्हिडिओ फुटेजमध्ये शेर बहादुर देउबा रक्तबंबाळ अवस्थेत दिसत होते. त्यांच्या डोळ्यांत भीती स्पष्टपणे दिसत होती. एकेकाळचे पंतप्रधान, ज्यांना भारताचे निकटवर्तीय मानले जायचे, ते आज संतप्त जमावाच्या दयेवर होते. आरजू देउबा यांच्याही अंगावर संतप्तांनी हल्ला चढवला.
फक्त देउबा नव्हे तर इतरही अनेक राजकीय नेते संतप्त युवकांच्या निशाण्यावर होते. अर्थमंत्री विष्णु प्रसाद पौडेल यांना देखील जमावाने रस्त्यावरून ओढत नेले. एकेकाळी लोक त्यांच्या सोबत फोटो काढण्यासाठी धावत होते, परंतु मंगळवारी जमाव त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी मागे लागला. पौडेल रस्त्यावरून जीव वाचवण्यासाठी धावताना दिसले. अन्य कॅबिनेट मंत्री, पक्ष कार्यालये, पोलीस ठाणे आणि सरकारी इमारतींवरही हल्ले झाले.
हिंसक जमावाने राजधानीतील संसद भवनाला आग लावली. केवळ संसद भवनच नव्हे, तर मंत्रालये, पक्षांचे कार्यालय, आणि अगदी पशुपतिनाथ मंदिराच्या प्रवेशद्वारालाही वाचवले गेले नाही. मोठ्या प्रमाणात सार्वजनिक आणि सरकारी मालमत्तेचे नुकसान झाले.
स्थिती हाताबाहेर गेल्यानंतर अखेर नेपाळ सरकारला लष्कराला मैदानात उतरवावे लागले. काठमांडूच्या रस्त्यांवर सशस्त्र जवान तैनात करण्यात आले. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून राजधानीत अघोषित आणीबाणीचे चित्र निर्माण झाले आहे.
Gen-Z आंदोलन हे सोशल मीडिया बंदीविरोधात सुरू झाले. नेपाळ सरकारने काही प्लॅटफॉर्मवर निर्बंध लादल्याने तरुण पिढी आक्रमक झाली. सुरुवातीला शांततेत सुरू झालेले आंदोलन पोलिसांच्या कारवाईनंतर भडकले. आंदोलनाने हिंसक रूप घेताच जमावाचा राग थेट सत्ताधाऱ्यांवर व माजी नेत्यांवर व्यक्त झाला.
या घटनांमुळे नेपाळमध्ये राजकीय संकट अधिकच गहिरे झाले आहे. शेर बहादुर देउबा व आरजू देउबा यांना झालेला जबर हल्ला हे नेपाळमधील असंतोष किती खोलवर रुजले आहे याचे उदाहरण मानले जात आहे. संतप्त नागरिकांचा आक्रोश सत्ताधाऱ्यांसोबतच जुने नेतेही आता टाळू शकत नाहीत, हे या घटनेतून स्पष्ट झाले आहे.