राष्ट्रवादी काँग्रेसची ठाम भूमिका! वैष्णवीला न्याय मिळालाच पाहिजे

0
102

माणदेश एक्सप्रेस न्युज|पुणे : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाने राज्यभरात संतापाची लाट उसळली असताना, या प्रकरणात आरोपी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची पक्षातून तात्काळ हकालपट्टी करण्यात आली आहे. या अमानुष आणि लज्जास्पद घटनेमुळे संपूर्ण समाज सुन्न झाला असून, मानवी संवेदनांना हादरवणारा प्रकार म्हणून याकडे पाहिले जात आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अधिकृत भूमिका मांडताना पक्षाचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी सांगितले, “राजेंद्र हगवणे यांच्या घरात घडलेली घटना ही समाजाला लज्जास्पद ठरवणारी असून ती मानवतेला काळीमा फासणारी आहे. त्यामुळे त्यांना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असून, त्यांच्या पदावरूनही तात्काळ हटवण्यात आले आहे.”

 

पक्षाने स्पष्ट केले की, हे प्रकरण केवळ एका कुटुंबातील वैयक्तिक घटना नसून, समाजातील विषारी मानसिकतेविरोधातील लढा आहे. वैष्णवीला न्याय मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असेही पक्षाने जाहीर केले.

 

“समाजात अशा घटनांचे पुनरावर्तन होऊ नये यासाठी कठोर कारवाई आवश्यक आहे. आम्ही प्रशासनाकडे मागणी करतो की या प्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या सर्व आरोपींवर तत्काळ कारवाई करण्यात यावी,” अशी मागणी चव्हाण यांनी केली.

 

वैष्णवी हगवणे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती शशांक हगवणे, सासरे राजेंद्र हगवणे, सासू लता हगवणे, दिर आणि नणंद यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये तिघांना पोलिसांनी अटक केली असून, राजेंद्र हगवणे आणि मोठा दिर अद्याप फरार आहेत.

 

राजेंद्र हगवणे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी असल्यामुळे त्यांच्या अटकेस विलंब का होत आहे, असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला जात होता. त्यानंतर पक्षाने घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे जनतेच्या भावना काहीशा शांत झाल्या आहेत, मात्र न्यायासाठीचा लढा अद्याप सुरूच आहे.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here