
माणदेश एक्सप्रेस न्युज | मुंबई :
नवी मुंबईतील नेरूळ परिसरात घडलेल्या एका अत्यंत गंभीर घटनेने स्थानिकांमध्ये खळबळ उडवली आहे. 12 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला ओळखीतल्या एका नराधमाने धमकी देत स्वतःच्या घरी नेऊन बलात्कार केल्याची ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
मुलगी घरी एकटी असताना आरोपी तिच्या घरी आला. त्या मुलीला आपल्याबरोबर घरी नेले. घरी पोहोचताच त्याने मुलीला जबरदस्तीने कपडे काढण्याची धमकी दिली. मुलगी तयार नसल्याने आरोपीने तिच्या भावाचा जीव घेईन, अशी धमकी दिली. घाबरलेल्या मुलीला आरोपीच्या दबावाला बळी पडावे लागले आणि त्यानंतर त्याने बलात्कार केला.
सायंकाळी मुलीची आई घरी परतली तेव्हा मुलगी सतत रडत होती. आईने विचारपूस केली असता तिने संपूर्ण प्रकार सांगितला. हे ऐकून आई हादरली आणि तत्काळ मुलीला घेऊन नेरूळ पोलीस ठाण्यात धाव घेतली.
तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी दाखल केले. तपासणीत बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी आरोपीला त्याच्या घरी जाऊन अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे. पुरावे गोळा करण्याचे कामही सुरु असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
या घटनेनंतर मुलीला मोठा मानसिक धक्का बसला आहे. त्यामुळे तिचे समुपदेशन करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांची मदत घेतली जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
या घटनेमुळे नेरूळ परिसरात संतापाची लाट पसरली आहे. नागरिकांकडून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे.