
माणदेश एक्सप्रेस न्यूज | नवी मुंबई :
मराठा आंदोलनाच्या निमित्ताने नवी मुंबईत गेल्या तीन दिवसांत मदतीचा अक्षरशः महापूर आला. राज्याच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घरातून आंदोलकांसाठी भाकरी, चटणी, ठेचा, लोणचे, भाजी, पाणी अशा शिदोरींचा ओघ इतका वाढला की वाशीतील सिडको प्रदर्शन केंद्र मदतीच्या राशींनी भरून गेले. आंदोलनाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत तब्बल १० लाखांहून अधिक भाकऱ्या नवी मुंबईत जमा झाल्या, असा अंदाज आहे.
आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी मुंबईतील हॉटेल बंद राहिल्याने जेवणाची कमतरता जाणवली. ‘पाणी कमी पडत आहे’, हा संदेश राज्यभर पोहोचताच प्रत्येक गावात ‘एक शिदोरी आंदोलकांसाठी’ अभियान सुरू झाले. गावोगावच्या महिलांनी आपल्या कुवतीप्रमाणे वर्गणी काढून भाकरी-चपात्या भाजल्या, चटणी-ठेचा करून बांधल्या आणि मोठ्या प्रमाणात पाण्याच्या बाटल्या व भाजीपाला पाठवला.
या मदतीचा एवढा ओघ आला की सिडको प्रदर्शन केंद्रात चार ठिकाणी स्वतंत्रपणे भाकरी, भाजी, ठेचा, पाणी व इतर साहित्य ठेवावे लागले. खराब होण्याची शक्यता असलेले अन्न तातडीने वेगळे केले जाऊ लागले. आलेले साहित्य आंदोलकांपर्यंत त्वरीत पोहोचवण्यासाठी स्वयंसेवकांनी जबाबदारी स्वीकारली.
दोन दिवसांतच इतके अन्नसाहित्य जमा झाले की ते संपूर्ण शहराला पुरेल. अखेर मंगळवारी मराठा समाजातील आयोजकांनी “भाकरी खूप झाल्या आहेत, आता मदत थांबवा”, असे सार्वजनिक आवाहन करावे लागले. आंदोलनाच्या इतिहासात ही दुर्मिळ घटना ठरली.
मंगळवारी सायंकाळी आंदोलन संपुष्टात आल्यानंतर उरलेल्या भाकऱ्या, चटणी, लोणचे, ठेचा आणि हजारो पाण्याच्या बाटल्या वाया जाऊ नयेत म्हणून त्यांचे दान गरजूंना करण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला.
विजय माने व बबन भिलारे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी उरलेले साहित्य रात्री उशिरापर्यंत सायन रुग्णालय, जे. जे. रुग्णालय आणि मुंबईतील विविध अनाथाश्रमांमध्ये पोहोचवले.
गावोगावच्या सामान्य नागरिकांनी कुवतीनुसार वर्गणी काढून अन्न व पाण्याची व्यवस्था केली. “आम्ही दिलेली शिदोरी आंदोलनाच्या वेळी आंदोलकांच्या उपयोगी पडलीच, पण आता ती रुग्ण व अनाथ मुलांच्या पोटात जाणार आहे, याचे समाधान वेगळेच आहे”, असे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.
मराठा आरक्षणाच्या लढ्यात हजारो लोकांचा सहभाग होता. भाकरी-चटणीचा हा महापूर केवळ आंदोलनाला आधार देणारा नव्हता, तर महाराष्ट्राच्या सामाजिक एकोप्याचे प्रतीक ठरला. आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, “भाकरी ही उपासमारीसाठी नाही, तर वाटण्यासाठी आहे” याचा प्रत्यय संपूर्ण राज्याला या आंदोलनाने दिला.