कंटाळलो होतो म्हणून आईची हत्या केली; पोटच्या मुलाने घेतला जीव, पोलिसही हादरले

0
469

माणदेश एक्सप्रेस न्यूज | नाशिक :
आई-मुलाच्या प्रेमळ नात्याचाच गळा घोटणारी थरकाप उडवणारी घटना नाशिक शहरात उघडकीस आली आहे. नाशिकरोड परिसरात एका ५७ वर्षीय मनोरुग्ण मुलाने अंथरुणाला खिळलेल्या ८५ वर्षीय आईचा गळा आवळून खून केला. “मला कंटाळा आला म्हणून मी आईला मारले,” असे थंड डोक्याने पोलिसांसमोर सांगणाऱ्या या मुलाच्या कबुलीजबाबाने संपूर्ण पोलिस दलच हादरले आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे नाशिक शहरात एकच खळबळ उडाली आहे.


नाशिकरोड येथील जेलरोड भगवा चौकाजवळील अष्टविनायकनगरमध्ये ही घटना घडली. यशोदाबाई मुरलीधर पाटील (वय ८५) या वृद्ध माता गेल्या काही वर्षांपासून आजारी होत्या आणि अंथरुणावरच खिळल्या होत्या. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा अरविंद उर्फ बाळू मुरलीधर पाटील (वय ५७) हा राहत होता. मानसिक आजाराने ग्रस्त असलेल्या अरविंदची पत्नी त्याला काही वर्षांपूर्वी सोडून गेली होती. त्यामुळे घरात फक्त आई आणि मुलगा असे दोघेच राहत होते.

मंगळवारच्या मध्यरात्री बाळूने आईच्या झोपेच्या अवस्थेत तिचा गळा आवळून तिचा खून केला. त्यानंतर तो स्वतःच शांतपणे घराबाहेर पडला आणि थेट नाशिकरोड पोलीस ठाण्यात जाऊन “मी माझ्या आईचा गळा आवळून खून केला,” अशी कबुली दिली.


पोलिसांनी सुरुवातीला या घटनेवर विश्वास ठेवला नाही. मनोरुग्ण असलेल्या बाळूने असं काही केलंय का, हे त्यांना पटत नव्हतं. मात्र, घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी त्याला लगेचच ताब्यात घेतलं आणि घटनास्थळी पोहोचले.

अष्टविनायकनगरमधील घरात प्रवेश करताच पलंगावर यशोदाबाई या निपचित पडलेल्या अवस्थेत सापडल्या. त्यांच्या गळ्यावर स्पष्ट जखमेचे निशाण होते. त्यामुळे मुलाच्या कबुलीजबाबाची पुष्टी झाली. लगेचच पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.


घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी, तसेच नाशिक रोड पोलीस ठाण्याचे निरीक्षक जितेंद्र सपकाळे हे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून सखोल चौकशी सुरू केली. शेजाऱ्यांकडून विचारपूस केली असता, बाळू काही दिवसांपासून मानसिक अस्थिर असल्याचे आणि तो वारंवार स्वतःशीच पुटपुटत बसतो, अशी माहिती समोर आली आहे.


पोलिस चौकशीत आरोपी बाळूने जे सांगितले ते ऐकून सर्वजण स्तब्ध झाले. त्याने पोलिसांना सांगितले, “आई सतत आजारी होती. तिची सेवा करण्यात मी थकलो होतो. मला आयुष्य कंटाळवाणं वाटत होतं… म्हणून मी तिला मारलं.” त्याच्या या थंडपणे दिलेल्या कबुलीजबाबाने पोलिस अधिकाऱ्यांनाही काही काळ काय बोलावं हे सुचलं नाही.


या घटनेबाबत नाशिक रोड पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी बाळूला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, प्राथमिक माहितीनुसार आरोपीचा मानसिक आजार गंभीर स्वरूपाचा असल्याने त्याच्या वैद्यकीय तपासणीचीही तयारी पोलिसांनी सुरू केली आहे.


आई म्हणजे मायेचं मूर्तिमंत प्रतीक. आपल्या जन्मदात्या आईचाच जीव घेणारा मुलगा अशी घटना समाजासाठी एक काळा दिवस ठरली आहे. मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास किती भयानक परिणाम होऊ शकतात याचं हे जिवंत उदाहरण मानलं जात आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here