कॅफेमध्ये गँगवारसारखा खून, मैत्रिणीचाच कट?; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

0
191

माणदेश एक्सप्रेस न्युज | नाशिक :
नाशिक शहर पुन्हा एकदा भयानक गुन्ह्याने हादरलं आहे. पाथर्डी फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील एका कॅफेमध्ये गुरुवारी (२५ सप्टेंबर) दुपारी टोळक्याने भरदिवसा कोयता आणि चॉपरने वार करत एका तरुणाचा खून केला. घटनेनंतर परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला असून पोलिसांना दंगल नियंत्रण पथक पाचारण करावं लागलं.

हत्या झालेल्या तरुणाचे नाव राशिद हारुन खान (२२, रा. अंबड लिंक रोड, खाडी) असे आहे. प्राथमिक तपासात ही हत्या पूर्ववैमनस्यातून रचलेल्या कटाचा भाग असल्याचे उघड झाले आहे.


अंबड लिंक रोडवरील दत्तनगर व खाडी परिसरात राहणाऱ्या राशिदसोबत स्थानिक “गॅस गँग” या टोळक्याचा काही महिन्यांपूर्वी वाद झाला होता. त्या वेळी देखील अंबड पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती. मात्र, योग्य ती कारवाई झाली नाही, असा आरोप मृताच्या नातेवाइकांनी केला आहे.


गुरुवारी दुपारी राशिदला त्याच्या एका मैत्रिणीने पाथर्डी फाटा परिसरातील निसर्ग कॉलनी येथील कॅफेमध्ये बोलावले. तो तिथे पोहोचताच युवतीने मारेकऱ्यांना माहिती दिली, असे पोलिस तपासातून स्पष्ट झाले आहे.

त्यानंतर अचानक हल्लेखोरांनी कॅफेमध्ये धाड टाकली आणि कोयता व चॉपरने बेदम वार करत राशिदचा खून केला. या घटनेने कॅफे व परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले.


घटनेनंतर मृताच्या नातेवाइकांनी व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी धाव घेतली. आक्रोश, टाहो, संताप व्यक्त होताच परिस्थिती तणावपूर्ण झाली. पोलिसांनी तातडीने दंगल नियंत्रण पथकाला पाचारण केले.

पोलिस उपायुक्त किशोर काळे, सहायक पोलिस आयुक्त शेखर देशमुख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी घटनास्थळी पाहणी करून कडक बंदोबस्त लावला. पंचनामा करून मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला.


काही दिवसांपूर्वी मृत राशिदच्या घरावर हल्ला करण्यात आला होता. त्यामागे संशयित गयासुद्दीन असल्याची नोंद आहे. तो हल्ल्यानंतर परराज्यात फरार झाला होता. मात्र, त्यानेच फोनद्वारे संपर्क साधून साथीदारांना हल्ल्यासाठी प्रवृत्त केले, अशी संशयित माहिती पोलिसांकडून समोर आली आहे.


“माझा भाऊ पाथर्डी गावात कामानिमित्त गेला होता. तिथून परतताना तो कॅफेमध्ये चहा पिण्यासाठी थांबला आणि तेथे हल्लेखोरांनी त्याला ठार मारले. पोलिस कठोर कारवाई करेपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही,” अशी संतप्त प्रतिक्रिया राशिदचा भाऊ इमरान खान याने दिली.


इंदिरानगर पोलिसांनी वेगाने हालचाल करत या खुनात सामील असलेल्या युवतीसह एकूण सहा संशयितांना अटक केली आहे. गुन्हे शाखा युनिट-१ व युनिट-२ चे पथक उर्वरित हल्लेखोरांच्या शोधात आहे.

पोलिस उपायुक्त किशोर काळे यांनी सांगितले की,

“खुनाच्या घटनेनंतर काही तासांत सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. आणखी काही संशयित गुन्ह्यात सहभागी असल्याचे दिसते. त्यांचाही शोध सुरू आहे. कोणीही अफवा पसरवू नये. गुन्हेगारांची गय केली जाणार नाही.”


एका युवतीच्या ‘टीप’मुळे भरदिवसा गँगवार पद्धतीने घडवून आणलेला हा खून केवळ नाशिक नव्हे तर राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे. पोलिसांनी घेतलेली वेगवान अटक मोहीम कौतुकास्पद असली तरी “गॅस गँग”सारख्या टोळक्यांना पोलीस आधीपासूनच रोखण्यात का अपयशी ठरले? हा प्रश्न नागरिकांतून मोठ्या प्रमाणात उपस्थित केला जात आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here