मालवण येथील रोजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यातील राजकारण प्रचंड तापले आहे. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा संग्राम सुरू झाला. दरम्यान, महाविकास आघाडीने महायुतीविरोधात जोडे मारो आंदोलनही केले. या आंदोलनावर टीका करताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसबाबत उद्धव ठाकरे यांना सवाल केला. त्यावेळी त्यांनी महाराजांनी सूरत लुटली नव्हती असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यावरून देवेंद्र फडणवीसांवर प्रचंड टीका झाली. आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं १० वर्षांपूर्वीचं रायगडावरील एक भाषण व्हायरल होतंय.
नरेंद्र मोदींच्या व्हायरल भाषणात काय म्हटलंय?
१० वर्षांपूर्वी म्हणजेच ५ जानेवारी २०१४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रायगडावर भाषण केलं होतं. या भाषणात ते म्हणाले, “३५० वर्षांपूर्वी ६ जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज सूरत येथे गेले होते. इतिहासाने छत्रपती शिवाजी महाराजांप्रति किती अन्याय केला आहे. लिहून टाकलं की सूरतेला महाराजांनी लुटलं. औरंगजेबाने सूरत येथे संपत्ती लपवून ठेवली होती, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत येथे येण्याचं कष्ट घेतलं. छत्रपती शिवाजी महाराजांना वाटायचं की हिंदवी स्वराज्याची स्थापना करायची असेल तर या चोरांनी जे धन लुटलं आहे त्यालाच आणून त्यांच्याच पैशांचा वापर करून मी हिंदवी स्वराज्याची स्थापना करेन. जर स्थानिक लोकांची मदत नसती तर हे काम शक्य झालं नसतं. मी अनुमान लावू शकतो की त्या काळातील सूरतच्या लोकांनी महाराजांना माहिती दिली असेल, लोकांनी महाराजांना रस्ता दाखवला असेल, छत्रपती शिवाजी महाराजांना आणि त्यांच्या मावळ्यांना लपवण्याचं, त्यांच्या राहण्याची, खाण्याची सोय केली असेल. सूरतच्या त्या काळातील लोकांनी महाराजांना मदत केली असेल. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबची संपत्ती जप्त केली असेल. त्यामुळे सुरत लुटली असा शब्द प्रयोग करणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा घोर अपमान आहे. ही विकृत इतिहासकारांची देण आहे”, असं नरेंद्र मोदी म्हणाले होते.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर याच काँग्रेसने शिकवलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटली. छत्रपती शिवरायांनी सूरत लुटलीच नाही. उलट सूरतच्या लोकांनी तिथे छत्रपतींचा पुतळा बसवला आहे. तरीही काँग्रेसने शिकवण दिली की छत्रपती शिवरायांनी सूरत लुटली. याची माफी काँग्रेस मागणार का?
पहा व्हिडीओ: