
माणदेश एक्सप्रेस न्यूज|मुंबई : राज्यात हिंदी सक्तीच्या निर्णयावरून एकीकडे ठाकरे बंधूंनी एकत्र येत मोर्चा पुकारल्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असतानाच, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. एकेकाळचे शिवसेना नेते आणि आता भाजपचे वरिष्ठ नेते असलेल्या राणेंनी फेसबुक पोस्टद्वारे आपल्या भावना व्यक्त करत उद्धव ठाकरे यांच्यावर थेट प्रहार केला आहे.
“उद्धव ठाकरे सध्या राज ठाकरे यांना भाऊ म्हणून पुन्हा एकत्र येण्याचे आवाहन करत आहेत. मात्र हेच उद्धव ठाकरे कधीकाळी राज ठाकरे यांना पक्षातून बाहेर जाण्यास भाग पाडत होते. त्यांना त्रास देत होते, छळ करत होते. आज त्याच व्यक्तीच्या मागे भाऊ म्हणून लागणं ही शोकांतिका आहे,” असा सवाल नारायण राणे यांनी उपस्थित केला आहे.
राणेंनी आपल्या पोस्टमध्ये आणखी म्हटलं आहे की, “शिवसेना मोठी करण्यासाठी राज ठाकरे, एकनाथ शिंदे, गणेश नाईक आणि मी आमचं आयुष्य दिलं. मात्र याच उद्धव ठाकरेंनी आम्हा सर्वांना बाहेरचा रस्ता दाखवला. बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांना मुख्यमंत्री बनवलं त्यांनीच शिवसेनेला सत्तेच्या बाहेर फेकलं. शिवसेनेच्या अधोगतीला पूर्णपणे जबाबदार उद्धव ठाकरेच आहेत.”
“मराठी माणूस आणि हिंदूंनी यांना घरी बसवलं आहे. गेलेले परत मिळवण्याची ना ताकद उद्धव ठाकरेंमध्ये आहे, ना क्षमता. ‘जो बूंद से गया, वो हौद से नाही येत’,” अशा शब्दांत राणेंनी टोला लगावला.
राज्यातील हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोर्चाचे आवाहन केले होते, ज्याला उद्धव ठाकरे यांनीही पाठिंबा दिला. त्यानुसार ५ जुलै रोजी मुंबईत भव्य मोर्चा निघणार होता. मात्र सरकारने या अगोदरच संबंधित दोन जीआर रद्द करून निर्णय मागे घेतल्याने हा मोर्चा रद्द करण्यात आला. आता या ठिकाणी “विजयी मेळावा” आयोजित केला जाणार आहे, ज्यात ठाकरे बंधू पुन्हा एकत्र व्यासपीठावर दिसणार आहेत.
या राजकीय घडामोडींवर भाजपकडून टीकेची झोड उठवली जात असून, नारायण राणेंची ही पोस्ट त्याचाच एक भाग असल्याचे सांगितले जात आहे.